रायगड :लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज सर्वत्र शांततेत मतदान पार पडत असताना महाड तालुक्यातील एका ७५ वर्षीय वृद्धाचा मतदान केंद्र गाठण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील उष्णतेचा पारा सकाळी नऊ नंतर ४३°C च्या वर जात असल्याने सकाळीच मतदान उरकून घेण्याकडे बहुतेक मतदारांचा भर असतो. मात्र प्रकाश चिनकटे (वय वर्ष ७५) हे मतदानकेंद्रावर जाण्यासाठी घरातून निघाले असताना वाटेतच चक्कर येऊन पडल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे.महाड तालुक्यातील किंजळोली दाभेकर कोंड येथील रहिवासी प्रकाश चिनकटे हे मतदान करण्यासाठी पायी जात होते. मतदानकेंद्राच्या केवळ शंभर मीटर नजीक असताना चिनकटे चक्कर येऊन रस्त्यावर कोसळले. यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे किंजळोली दाभेकर कोंड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रकाश केशव चिनकटे हे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत. चिनकटे मतदान केंद्रावर आले असता तेथे उपस्थित आरोग्य पथकातील आशा स्वयंसेविकांनी त्यांना पाणी पाजवून रिक्षातून घरी सोडले. घरी त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना महाड येथे वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचे निधन झाले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी मनिषा विखे यांनी दिली आहे.
कोल्हापूर मतदारसंघातील उत्तरेश्वर पेठ येथे राहणारे महादेव श्रीपती सुतार हे सकाळी १० च्या सुमारास मतदान केंद्रावर पोहोचले. दरम्यान ते रांगेत उभे असतानाच अचानक चक्कर आल्याने जागेवरच कोसळले. या घटनेमुळे मतदान केंद्राच्या परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. नातेवाईकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा अंत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.