शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; १० जूनला मतदान, अर्ज ते निकाल, कसं असेल नियोजन?

Khozmaster
2 Min Read

नाशिक : महाराष्ट्रातील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दि. १० जून रोजी मतदान होणार आहे.

सन २०२४ हे पूर्ण वर्ष निवडणुकांचे आहे. देशभरात सध्या लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले असून, चौथ्या टप्प्यात दि. १३ मे रोजी मतदान होणार आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत पाचव्या टप्प्यात दि. २० मे रोजी मतदान होणार आहे. त्या पाठोपाठ आता शिक्षक मतदारसंघ, विधानसभा, महापालिका व जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पुढील काही महिन्यांतच निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

मुंबई आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासह नाशिक व मुंबई शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदारांची मुदत दि. ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने संबंधित चार मतदारसंघांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून सध्या किशोर दराडे आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत असल्याने नाशिक विभागातही निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीबाबतची अधिसूचना बुधवारी (दि. १५) जारी झाली.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी सोमवार, दि. २० मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. उन्हाचा वाढता तडाखा आणि सलग सुट्ट्यांमुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची भीती जिल्हा प्रशासनानेदेखील व्यक्त केली आहे. आगामी निवडणुकांचे मतदान सलग सुट्ट्यांना लागून येऊ नये, असे विनंतीपत्र जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच निवडणूक आयोगाला दिले होते. परंतु, तरीही शिक्षक मतदारसंघाची निवडणूकदेखील शनिवार, रविवारच्या सलग सुट्टीला लागून सोमवारीच घेण्यात येणार आहे.

…असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्धी- दि. १५ मे
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत- २२ मे
नामनिर्देशनपत्रांची छाननी- २४ मे
नामनिर्देशनपत्र माघारीची मुदत- २७ मे
मतदानाचा दिनांक- १० जून
मतदानाची वेळ- सकाळी आठ ते दुपारी चार
मतमोजणीचा दिनांक- १३ जून
एकूण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक- १८ जून
नाशिक विभागातील शिक्षक मतदार संख्या
जिल्हा मतदार
नाशिक २३५९७
अहमदनगर १४६४८
जळगाव १३०५६
धुळे ८०८८
नंदुरबार ५४१९
एकूण ६४८०८
0 8 9 4 7 8
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *