नागपूर : कोव्हिडनंतर एकीकडे मोठमोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. वर्षभराचा विचार करता साधारणपणे दोन लाखांनी घरे महागली आहेत.
नागपूर आणि इतर टियर-टू शहरांमध्ये ‘लक्झरिअस’ घरांना मागणी वाढली आहे. एका सर्वेक्षणानुसार, २६ टक्के प्रॉपर्टी गुंतवणूकदार आता मोठ्या शहरांऐवजी टियर-टू आणि टियर-थ्री शहरांमध्ये गुंतवणूक करीत आहेत. हे परिवर्तन प्रामुख्याने कोव्हिडनंतर दिसून आले आहे.यामध्ये नागपूरचादेखील समावेश आहे. मात्र, याचसोबत गृहनिर्माण प्रकल्प उभारायला लागणारा बांधकाम खर्च वाढला आहे. बांधकाम खर्च वाढल्याने ग्राहकांनाही हक्काच्या घरासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. बांधकाम खर्च वाढण्यामागे प्रामुख्याने कच्च्या मालाचे वाढलेले दर कारणीभूत आहेत.यासंदर्भात अधिक सांगताना नरेडको विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष घनश्याम ढोकणे म्हणाले, ‘रेती घाट सुरू न झाल्यामुळे रेती अव्वाच्या सव्वा दरात विकली जात आहे. जवळपास १३०० रुपये प्रतिब्रास दराने रेती उपलब्ध होत आहे. घर बांधकामातील दुसरा महत्त्वाचा घटक असलेल्या लोखंडी सळाखींचा दर कार्टेलिंग करून वाढविण्यात आला आहे. लोखंड प्रतिमेट्रिक टन ५२ हजार रुपये दराने विक्री होत आहे.हा दर प्रतिमेट्रिक टन ३८ हजार रुपये व्हायला हवा, अशी मागणी आहे. मात्र, त्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. हा दर कमी झाल्यास बांधकाम खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. सिमेंटचा दरदेखील पूर्वीच्या तुलनेत चांगलाच वाढला आहे. किरकोळमध्ये प्रतिगोणी ३३० रुपयांना मिळणाऱ्या सिमेंटचा दर आता ३८० रुपयांवर पोहोचला आहे. यावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे.’
घर बांधकामासाठी विटा, गिट्टी, पाइप तसेच इलेक्ट्रिक फिटिंगसाठी लागणारे केबल, स्विच आदींची आवश्यकता असते. या सर्वांच्या दरांमध्ये अद्याप घट झालेली नाही. ही दरघट लवकरात लवकर झाल्यास त्याचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. विशेषत्वाने इलेक्ट्रिक वायर, फिटिंग्स, टाइल्स, पाइप, सॅनिटरी वायर, फॅब्रिकेशन, अॅल्युमिनिअम यांचे दर कमी होण्याची गरज बांधकाम क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.