साईनबोर्ड लावण्यात सराईत, 26 गुन्हे, विधानसभाही लढवली; भावेश भिडे आहे तरी कोण?

Khozmaster
2 Min Read

घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 44 जणांवर उपचार सुरू आहेत. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या घटनेनंतर आता आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. याच दरम्यान, आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इगो मीडिया कंपनीने हे होर्डिंग्ज लावले होते. या कंपनीचा मालक भावेश भिडे याने विधानसभेची निवडणूक लढवली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्यावर बेकायदेशीर होर्डिंग्ज लावल्याप्रकरणी असंख्य गुन्हे असल्याचंही समोर आलं आहे.

घाटकोपर येथील पेट्रोल पंप होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिडे याने 2009 साली मुलुंड येथून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली असल्याचं समोर आलं आहे. त्याची इगो नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून शहरात भले मोठे होर्डिंग्ज लावले जातात. धक्कादायक म्हणजे त्याने निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्याच्यावर सुमारे 26 गुन्हे असल्याचं नमूद केले आहे. विना परवाना साईन बोर्ड लावल्याप्रकरणी त्याच्यावर 26 गुन्हे लावण्यात आल्याचं समोर आलं आहे.

रेल्वेने परवानगी दिलीच कशी?

महापालिकेच्या 328 कलमांतर्गत त्याच्यावर 26 गुन्हे आहेत. 2009 पर्यंतचा हा आकडा आहे. भावेश भिडे याच्यावर एवढे गुन्हे असतानाही रेल्वे पोलिसांनी त्याला होर्डिंग्ज लावण्याची परवानगी दिली कशी? यामागे कोण आहेत? त्याचं रेल्वे खात्यात कुणाशी साटंलोटं होतं? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

त्यांची चौकशी केली पाहिजे

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणारवर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. घाटकोपरमधील अनधिकृत पेट्रोल पंपाबाबत दरेकर यांनी डिसेंबर 2022 मध्ये अधिवेशना लक्षवेधी सूचना मांडली होती. पण अधिकाऱ्यांचं साटंलोटं असल्यामुळे योग्य ती कारवाई झाली नाही. त्यामुळेच निष्पाप लोकांचे बळी गेले, असा प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. आता या दुर्घटनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे.

शिवसेनेशी संबंध नाही

याप्रकरणावर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. या घटनेकडे अत्यंत गांभीर्यपूर्वक पाहिले पाहिजे. या प्रकरणात जो कोणी आरोपी असेल त्याला अटक केली पाहिजे, असं सांगतानाच भावेश भिंडेचा शिवसेनेशी काडीचाही संबंध नाही. आमचे फोटो व्हायरल केले जात आहेत. आम्हीही फोटो व्हायरल करू शकतो, असं अनिल परब म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *