परभणी: १४ मे च्या रात्री सातच्या दरम्यान वडिलांनी आपल्या ऑटो चालक मुलाला फोन करून घरी जेवण करण्यासाठी बोलावले. मुलाने देखील तासाभरात मी घरी येतो असा निरोप वडिलांना दिला. पण, पुढच्या एका तासात विपरीतच घडले. पैशाच्या देवाण-घेवाणीवरून ऑटो चालक मुलाला चाकूने भोसकले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत पावलेल्या ऑटो चालक मुलाचे नाव सगननूर कुरेशी असे असून तो परभणीच्या जिंतूर येथील साठे नगरातील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या जिंतूर शहरातील साठे नगर येथील ३६ वर्षीय सगननूर उर्फ छगन कुरेशी हा वास्तव्यास होता. १४ मे च्या रात्री सातच्या दरम्यान तो शहरातील नॅशनल उर्दू शाळेच्या परिसरामध्ये आपल्या ऑटोसह उभा होता. त्यावेळी त्याचा ३१ वर्षीय चुलत भाऊ अलीम कुरेशी आणि चुलत भावाचा ३२ वर्षीय मित्र अमजद कुरेशी हे दोघे तेथे आले. तिघांमध्ये पैशांवरून शाब्दिक चकमक झाली. बघता बघता शाब्दिक चकमकीने उग्ररूप धारण केल्याने तिघांमध्ये हाणामारी सुरू झाली. यातील आरोपी अमजद कुरेशी यांनी सगननुर उर्फ छगन कुरेशी याचे हात धरले आणि अलीम कुरेशी याने धारदार चाकूने त्याच्या पाठीवर जोरदार प्रहार केले. या घटनेत सगननूर उर्फ छगन कुरेशी गंभीर जखमी होऊन काहीवेळ घटना स्थळावर रक्तबंबाळ अवस्थेत पडून होता.नागरिकांना सगननूर कुरेशी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्यानंतर त्याच्या घरी याची माहिती दिली. छगन कुरेशीचे वडील आणि भाऊ तात्काळ घटनास्थळी आले. आपला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्यानंतर वडील आणि भावाने त्याला ऑटोमध्ये टाकून रुग्णालयात नेले.