नवी मुंबई : पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातील एका घरावर छापा मारुन बनावट नोटा छापणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. प्रफुल्ल गोविंद पाटील (२६) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने यूटयूबवर पाहून आपल्या घरातच बनावट नोटा छापल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून २ लाख ३ हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा तसंच, बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य जप्त केलं आहे.या कारवाईत अटक करण्यात आलेला आरोपी प्रफुल्ल गोविंद पाटील हा तळोजा एमआयडीसीतील तोंडरे गावात राहत होता. तसेच तो घरामध्येच कॉम्प्यूटर आणि प्रिंटरद्वारे बनावट नोटा तयार करुन त्या नोटा आपल्या एजंटमार्फत बाजारात चलनात आणत होता. याबाबतची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती.
सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम आणि त्यांच्या पथकाने बुधवारी दुपारी तोंडरे गावातील आरोपी राहत असलेल्या घरावर छापा मारला.