छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील, मौजे पळसखेडा येथे दुष्काळी परिस्थितीमध्ये फळबाग वाचवण्याची मोहीम अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये डॉ. डी. बी. कच्छवे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामध्ये ठिबक, तुषार सारख्या आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर, मडका सिंचन पद्धतीचा वापर, हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर, तसेच आच्छादनाचा वापर, खोडास बोर्डो पेस्ट लावणे, शेततळ्याच्या पाण्याचे बाष्पीभवन थांबवणे, केओलीन व 13:00:45 या रसायनाचा वापर करून दुष्काळात फळबागा वाचवणे इत्यादी. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी श्री. एम. एन. शिसोदिया यांनी आगामी खरीप हंगाम पेरणीच्यादृष्टीने पूर्वनियोजन बाबत शेतकऱ्याला मार्गदर्शन केले. त्यामध्ये जमीन निवड, जमिनीची पूर्वमशागत तसेच सिंचनाचे नियोजन, त्यानंतर पिकाची फेरपालट करण्याच्या दृष्टीने पिकाची निवड करणे, आंतरपिकाचा समावेश करणे, तसेच पिकाचे आपल्या जमिनीस व पाण्याच्या उपलब्धतेनुसार योग्य वाण निवड करणे, त्यानंतर पेरणीच्या अगोदर बियाण्यास रोग होऊ नये म्हणून बुरशीनाशकाची तसेच कीटकनाशकांची व जैविक खतांची बीज प्रक्रिया करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच लागवडीनंतर विविध तणनाशकाबाबत माहिती दिली.या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी रमेश गुंडीले, पर्यवेक्षक चौधरी, कृषी सहाय्यक श्रीमती अहिरराव व चौरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.