मुंबई :मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला केल्या आहेत. त्यानुसार २ हजार ५० किमीपैकी २२४ किमीहून अधिक रस्त्याचे काम झाले आहे.
याव्यतिरिक्त ३९७ किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण हाती घेतले होते.
पावसाळ्याआधी ४० टक्के कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले होते. मात्र, आतापर्यंत २५ काँक्रिटीकरण कामे पूर्ण झाले. पावसाळ्याआधी ही कामे थांबवून रस्ते समतल करणे, खड्डे बुजविण्याला प्राधान्य देणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईत सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचे म्हणजेच सीसी करायचे जेणेकरून त्यावर वारंवार खड्ड्यांची समस्या उद्भवणार नाही, हे पालिकेचे लक्ष्य आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्याआधी मुंबईत २ हजार ०५० किमीचे रस्ते असून यापैकी ५० टक्के म्हणजेच अवघे २५ टक्केच कामे पूर्ण झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
पालिकेने कंत्राटदारांसोबत कठोरपणे वागले पाहिजे, कारण त्यात करदात्यांचा पैसा गुंतलेला आहे, वर्षभरापूर्वी रस्त्यांच्या निविदा काढूनही अद्याप २५ टक्के काम पूर्ण न होणे म्हणजे पालिकेची नामुष्की आहे. पालिकेने यासंबंधी रस्त्यांचा स्टेट्स रिपोर्ट लवकरात लवकर सादर करावा. -मकरंद नार्वेकर, माजी नगरसेवक, भाजप
जानेवारी २०२३ मध्येच निविदा काढली-
१) काँक्रिटीकरणाची एकूण ६९८ कामे महापालिका करणार असून त्यापैकी ३६५ कामे हाती घेण्यात आली आहेत.
२) साधारण १,२०० किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम पूर्ण झाले आहे. मुंबईतील शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील ३९७ किमीचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असून या कामासाठी जानेवारी २०२३ मध्येच निविदा काढण्यात आली होती.
३) यासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपयांचे कंत्राट पाच कंपन्यांना दिले आहेत तरीही विविध कारणांनी कंत्राट रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर आली आणि प्रक्रियेला विलंब लागला.
पूर्व आणि पश्चिम उपनगरातील काँक्रिटीकरणाची कामे सुरू असताना रस्त्यांच्या खाली असलेल्या पर्जन्यजलवाहिन्या, नवीन जलवाहिन्यांची कामे आणि उपयोगिता वाहिन्या अन्यत्र स्थलांतर करण्याची कामे करावी लागत आहेत. ही कामे प्राधान्याने पूर्ण करून काँक्रिटीकरण केले जात आहे. तसेच रस्ते कामांसाठी वाहतूक पोलिसांसह अन्य प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. ते प्राधान्याने केले जात असल्याचे स्पष्ट केले. या सर्व अडचणींमुळे उपनगरातील काँक्रिटीकरणाची कामे धीम्या गतीने सुरू आहेत.
सिमेंट काँक्रीटची कामे पावसाळ्यात बंद राहिल्यानंतर सप्टेंबर अखेरपासून कामांना पुन्हा सुरुवात केली जाईल. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला आहे.