“अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार

Khozmaster
2 Min Read

 लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान ०१ जून रोजी होणार आहे. तर, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मिळणाऱ्या जागांबाबत विविध दावे केले जात असतानाच, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या एका विधानावरून महायुतीत आलबेल नसल्याचे चित्र असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

एक निवडणूक झाली. आता यापुढे महायुतीत आपल्याला योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. आपण आलो तेव्हा त्यांनी आपल्याला ८० ते ९० जागा मिळतील असे सांगितले होते. लोकसभेवेळी जी खटपट झाली ती पाहाता पुढे अशी होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजे. हे त्यांना सांगावे लागेल. तेवढ्या मिळाल्या तर ५०, ६० निवडून येतील. अन्यथा तुमच्या ५० आहेत, मग ५० घ्या. मग त्यातून पुन्हा किती निवडून येणार, असे छगन भुजबळ म्हणाले होते. यावरून आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी छगन भुजबळांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना पलटवार केला आहे.

अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही

लोकसभेचे जागावाटप असेल किंवा विधानसभेच्या जागावाटपाबाबत काही मागणी असेल, तर ती मीडियाच्या माध्यमातून होत नाही. यातून काही कारण नसताना अडचणी आणि समस्या निर्माण होतात. विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही मत असेल किंवा इतरांचे मत असेल, त्यावर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली पाहिजे. मीडियाच्या माध्यमातून आम्हाला इतक्या जागा हव्यात, असे म्हणणे गैर आहे. यामध्ये तुम्हाला कोणी आश्वस्थ केले, याचा कोणताही पुरावा नसतो, तरीही सांगायचे असेल तर स्पष्टपणे सांगितले पाहिजे. आम्हाला एवढ्या जागा देण्यासंदर्भात या नेत्यांने शब्द दिला होता. पण अशा प्रकारचे धुके निर्माण करण्यात काहीही कारण नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसतील. योग्य फॉर्म्युला ठरवतील. त्यानुसार तीनही पक्षाला जागा मिळतील. भाजपा सर्वांत मोठा पक्ष असल्याने भाजपाला सर्वांत जास्त जागा मिळतील. मात्र, आमच्याबरोबरच्या दोनही पक्षाचा सन्मान केला जाईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *