पुण्यातील पोर्श कार अपघाताचे प्रकरण सध्या देशभरात तापलेले आहे. त्यातच छत्रपती संभाजनगरमधील या विचित्र अपघाताने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. भरधाव स्कॉर्पिओ कारने चार वाहनांना ठोकरले.
भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यावर ती गोल गोल फिरली. त्यानंतर तिने चार वाहनांना धडक दिली. त्यानंतर ती पेट्रोल पंपावरील एका खांबाला धडकली. पेट्रोल टँकला धडकणारच तो एका लोखंडी जाळीमुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
चार जण झाले जखमी
ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने भरधाव स्कॉर्पिओ जीपने मुख्य रस्त्यावरील वाहनांना उडवत पेट्रोल पंपावर धडकली. यात तीन चारचाकी आणि एका दुचाकीस्वाराला उडवले. या विचित्र अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही थरारक घटना छत्रपती संभाजीनगर-जळगाव रोडवरील माणिकनगर येथील काळे पेट्रोल पंपासमोर घडली.
असा घडला अपघात
भरधाव स्कॉर्पिओ जीपने मुख्य रस्त्यावरील वाहनांना उडवले. यात तीन चारचाकी आणि एका दुचाकीस्वाराला उडवले. ही धडक इतकी जोरात होती की, या कारच्या एअर बॅग्ज उघडल्या. त्यानंतर सिल्लोडकडून येणाऱ्या कारला (एमएच ०३ सीव्ही २०७०) धडक देऊन पुन्हा वळण घेऊन छत्रपती संभाजीनगरहून येणाऱ्या मोटारसायकलला (एमएच १५ बीव्ही ४३८३) या कारने जोराची धडक दिली. त्यानंतर ही जीप चक्क काळे पेट्रोल पंपात घुसली.
पेट्रोल पंपावरील कर्मचारी बचावले
वेग इतका होता की, पेट्रोल पंपाजवळील खांबाच्या भिंतीला लागून असलेले लोखंडी साइड गार्ड स्कॉर्पिओने तोडले. त्यामुळे पेट्रोल पंपावर एकच गदारोळ माजला. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या लोकांचा जीव टांगणीला लागला. काहींनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. आता ही स्कॉर्पिओ पेट्रोल टँकला धडकेल आणि मोठा अनर्थ घडेल असे वाटत असतानाच पेट्रोल टँकला लागून असलेल्या लोखंडी जाळीच्या गार्डमध्ये अडकल्याने दुर्घटनाग्रस्त स्कॉर्पियो जागेवरच थांबली. त्यामुळे पंपासमोर असलेले जवळपास तीस जण बचावले. या घटनेनंतर स्कॉर्पिओचालक पळून गेला. कार थांबल्यानंतर पेट्रोल पंपावरील उपस्थित सर्वांनीच सूटकेचा निःश्वास सोडला.