मुंबई : पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा, असे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, पाऊस तोंडावर येऊनही रस्त्यांची कामे झालेली नाहीत.
त्यामुळे ही कामे मार्गी लावण्यासाठी कंत्राटदारांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून, ती १० जूनपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या आहेत. तसेच त्यानंतर रस्त्यांच्या खोदकामाला परवानगी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे या तिन्ही विभागांतील निवडक रस्त्यांचा बांगर यांनी आढावा घेतला. १० जूनपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर तेथे पावसाळ्यात कुठेही बॅरिकेड्स दिसणार नाहीत, याची खातरजमा करावी. पावसाळ्यात कोणत्याही यंत्रणेला रस्ते खोदकामाची परवानगी दिली जाणार नाही. मात्र, वीज, गॅस, पाणी यासारख्या अत्यावश्यक गरजांच्या कामांसाठी गरजेनुसारच रस्ते खोदकामास परवानगी दिली जाईल. त्यानंतर संबंधित यंत्रणेने खड्डा न बुजविल्याचे आढळल्यास पालिकेने स्वतःहून तो खड्डा भरून रस्ता सुस्थितीत उपलब्ध करून द्यावा आणि त्या दुरुस्तीचा खर्च संबंधित यंत्रणेकडून वसूल करावा, अशी सूचना बांगर यांनी केली.
१४३ ठिकाणी रस्त्यांची कामे-
मुंबई महानगरात सुरू असलेल्या काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामांपैकी बहुतांश पूर्णत्वाकडे आहेत, तर काही कामे प्रगतिपथावर आहेत. यामध्ये मुंबई शहरात २४ ठिकाणी, पूर्व उपनगरांत ३२ ठिकाणी, तर पश्चिम उपनगरांमध्ये ८७ ठिकाणी कामे सुरू आहेत. यापैकी बहुतांश रस्ते ७ जूनपासून, तर उर्वरित काही रस्ते १० जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुले होतील, असे बांगर म्हणाले.
१० जूननंतर कारवाई करणार का ?
१) रस्त्यांच्या कामात दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. तसेच मुदतीत रस्त्यांची कामे न झाल्यास त्यांच्याकडून ते काम काढून घ्यावे आणि अन्य दुसरा कंत्राटदार नेमून कामे पूर्ण करावीत.
२) या कामांचा खर्च मूळ कंत्राटदाराकडून वसूल करावा आणि त्याला दंडही आकारावा, अशा सूचना बांगर यांनी यापूर्वी केल्या आहेत.
३) मात्र, आता १० जूनपर्यंत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना हा नियम लागू होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.