सुखोई विमान कोसळले, पंचनामा झाला, नुकसान भरपाई कधी आणि कशी मिळणार? शेतकरी चिंतेत

Khozmaster
3 Min Read

निफाड : तालुक्यातील शिरसगाव येथील शेतांत मंगळवारी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) सुखोई हे लढाऊ विमान कोसळल्याने शेतमालाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, नुकसान भरपाई कधी आणि कशी मिळणार, याकडे बाधित शेतकऱ्यांच्या नजरा आहेत.मंगळवारी शिरसगाव-वडाळी रोडवरील लक्ष्मण नारायण मोरे यांच्या गट नंबर २६ मध्ये अचानक सुखोई कोसळले. बाधित शेतकऱ्यांच्या शेती व पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तलाठी, कृषी सहाय्यक व एचएएलच्या संबंधित अधिकाऱ्यांनी केले. पण या शेतकऱ्यांचे पीक हातातून गेल्याने तत्काळ कोणतीही आर्थिक मदत नसल्याने या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

सुखोई विमान कोसळताना ते मोरे यांच्या विहिरीवरील तीन इलेक्ट्रिक पोलला धडकले. त्यामुळे हे पोल आणि पोलला असलेला विद्युत पंपाचे नुकसान झाले. शिवाय, विहिरीतही विमानाचे ऑइल पडल्याने ते पाण्यात मिसळले गेले. त्यामुळे हे पाणी पिण्याच्या तसेच पिकाला देण्याच्याही उपयोगाचे नाही. मोरे यांच्या शेतात कोबीचे पीक होते. विमान कोसळल्याने कोबीचे साधारण दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याच ठिकाणी दीड बिघ्यात काढणीस आलेली कोथिंबिर होती. त्यातून दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले असते. मात्र, या कोथिंबिरीचेही नुकसान झाले आहे. याशिवाय, विमान दुर्घटनेतील जखमी पायलटला घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर याच ठिकाणी उतरल्याने आणि लोकांची ये-जा झाल्याने हे पीक पायाखाली तुडवले गेल्याने ते पुरते वाया गेले आहे.

दुसरे शेतकरी सुखदेव मोरे यांच्या गट नंबर १३२-१३३ मध्ये उभ्या दोन एकर द्राक्षबागेला या दुर्घटनेचा तडाखा बसला आहे. जम्बो व्हरायटीची ही द्राक्षे आहेत. ही बाग उभी करून पुन्हा पिकासाठी तयारी करण्यात पुढची १० वर्षे जातील, आणि त्यामुळे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा मोरे यांचा दावा आहे. विमान पडले त्या ठिकाणी या वर्षीच्या टोमॅटो पिकासाठी पूर्ण तयारी केली होती. या पिकाचे भविष्यातील अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा ज्ञानेश्वर मोरे यांनी केला.

सहा वर्षांनंतरही भरपाई नाही

२०१८ साली तालुक्यातील वावी ठुशी येथेही सरावासाठी आलेले लढाऊ विमान कोसळले होते. त्यावेळी येथील ७ शेतकऱ्यांचे उभ्या पिकांचे नुकसान झाले होते. त्याही वेळी पंचनामे आणि सर्व सोपस्कार पूर्ण झाले. या सर्व शेतकऱ्यांचे २० कोटींच्या जवळपास नुकसान झाले. मात्र, एचएएलकडून या सर्व शेतकऱ्यांची एकत्रित १० लाख रुपयांतच बोळवण केली जात असल्याने शेतकऱ्यांनी त्यास नकार दिला. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ व खासदार भारती पवार यांनीही प्रयत्न केले. पण, एचएएल प्रशासनाने दाद दिली नाही. त्यामुळे हे सर्व शेतकरी एचएएलविरोधात कोर्टात गेले आहेत.

0 8 9 4 8 1
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *