फुलंब्री : गेल्या वर्षी दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांनी यंदा चांगला पाऊस होईल, या आशेने खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू केली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व कामे पूर्ण केली असून, आता सर्वांचे लक्ष पावसाच्या आगमनाकडे लागले आहे.
तालुक्याचे जून ते ऑक्टोबरचे पर्जन्यमान जेमतेम असते; गतवर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. खरीपातील तृणधान्यातील बाजरी, मका, ज्वारी, सोयाबीन व कडधान्याची सर्वच पिके करपून गेली होती. यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. खरीप हंगामात फुलंब्री तालुक्यात ५७ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज तालुका कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
त्यादृष्टीने विभागाकडून बियाणे व खतांचे नियोजन सुरू आहे. यंदा विहिरींना पाणीच नसल्याने बागायती क्षेत्रातील कपाशीचे क्षेत्र कमी झाले असून, २३ हजार ५०० हेक्टरवर कापूस लागवड होण्याची शक्यता आहे. शिवाय, मक्याची लागवड २२ हजार हेक्टरवर; तसेच बाजरीच्या पेरणी क्षेत्रातही वाढीचा अंदाज आहे.
अंदाज खरा ठरावा
हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यंदा हवामान विभागाचा अंदाज शंभर टक्के खरा तरी ठरो, अशी हात जोडून बळिराजा ईश्वरास प्रार्थना करत आहे. दुष्काळाने शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूर व सामान्य नागरिकही होरपळून निघाले आहेत. यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तालुका कृषी विभागाने खरीप हंगामात ५७ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. त्यानुसार बियाणे आणि खतांची मागणी कंपन्यांकडे नोंदविली आहे. यंदा शेतकऱ्यांसाठी मुबलक खते आणि बियाणे उपलब्ध करून दिली जातील. यामुळे त्याची टंचाई निर्माण होणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.यंदा दुष्काळ वाढत्या उष्णतेमुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे वर्षभर दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी होरपळून निघाला आहे. यंदा लवकर आणि जोरदार पावसाचे संकेत वेधशाळेने दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. नव्या खरीप हंगामाविषयी खूप अपेक्षा आहेत.