ब्लॉक संपला, हाल कधी थांबणार? लोकलला लेटमार्क गुरुवारी कायम; प्रवासी संतप्त

Khozmaster
3 Min Read

मुंबई : ठाणे आणि सीएसएमटी येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी हाती घेण्यात आलेला जम्बो ब्लॉक रविवारी संपला असला तरी सोमवारपासून लोकलला लागलेला लेटमार्क गुरुवार उजाडला तरी कायम होता.

या समस्येवर मध्य रेल्वे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी शब्द उच्चारलेला नाही. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला असून, नवनिर्वाचित खासदारांनी तरी लोकलच्या सर्वच प्रश्नांवर दिल्लीत आवाज उठवित दिलासा द्यावा, याकडे रेल्वे प्रवाशांनी लक्ष वेधले.

जम्बो ब्लॉकनंतर सोमवारपासून लोकल रुळावर येईल, अशी आशा प्रवाशांना होती. प्रत्यक्षात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल सेवेचा बोजवारा उडाला. मंगळवारी पहाटे पाच

वाजण्याच्या सुमारास परळ येथे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा कुर्ल्यापर्यंत चालविली जात होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

गोंधळात भर –

१) बुधवारीही लोकल रखडत धावल्या, तर गुरुवारीही लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.

२) सलग चार दिवस लोकलला लागणाऱ्या लेटमार्कने मुंबईकरांना जेरीस आणले असून, कार्यालय आणि घर गाठणाऱ्या प्रवाशांना सातत्याने मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

३) दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनाकडून फलाटांवर याबाबतची घोषणा होणे अपेक्षित आहे. मात्र, घोषणाही होत नसल्याने प्रवाशांच्या गोंधळात भर पडत असल्याचे चित्र आहे.

४) कुर्ला रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ४ आणि ६ वर गर्दी होेते.

५) जलद लोकल धिम्या मार्गावरील फलाटावर येताना घोषणा होत नाही. गर्दी, अतिरिक्त गाड्या, रेल्वेसेवेचा दर्जा या लोकल प्रश्नांवर नवनिर्वाचित खासदारांनी आता आवाज उठविला पाहिजे.

गेल्या तीन दिवसांपासून लोकल प्रवाशांचे हाल होत आहेत. लोकल अर्ध्या तासांहून अधिक काळ उशिराने धावत आहेत. भायखळा, दादर, कुर्ला आणि घाटकोपरसारख्या मोठ्या रेल्वे स्थानकांवर तर ‘पीक अव्हर’ला फलाटांवर उभे राहण्यास जागा नसते एवढी वाईट अवस्था आहे.- संदीप पटाडे, प्रवासी, घाटकोपर

मुंबईमध्ये झालेल्या तांत्रिक कामामुळे जेथे ६३ तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता, त्या ठिकाणी लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग नियंत्रित करण्यात आला आहे, त्यामुळे गाड्यांचे बंचिंग (एका मागोमाग गाड्या उभ्या राहणे) होते. परिणामी, गाड्यांचा गोंधळ सुरू आहे.-जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे

जलद मार्गावर जादा लोकल फेऱ्या आवश्यक होत्या. परंतु, तिकडे जादा लोकल नसल्याने या मार्गावरील प्रवाशांचा ताण धिम्या मार्गावर येत आहे. त्यामुळे धिम्या मार्गावर गर्दी वाढत आहे. शिवाय कारशेडमध्ये उभ्या असलेल्या एसी लोकल तरी चालविल्या पाहिजेत. तांत्रिक बिघाड होणार नाही यासाठी रेल्वेने खबरदारी घेणे आवश्यक होते. मात्र, त्यापैकी काहीच झालेले नाही. त्यामुळे हाल कायम आहेत. – सिद्धेश देसाई, सरचिटणीस, मुंबई रेल प्रवासी संघ

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *