मुंबई : पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्यांच्या तक्रारी सहज करता याव्यात, यासाठी पालिकेने लेखी तक्रारीसह दूरध्वनी, व्हॉट्सॲप, ॲपसह समाजमाध्यमांद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
दुसरीकडे संबंधित तक्रारीचा २४ तासांत निपटारा करण्याची सूचना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या आहेत. त्यामुळे तक्रारींची सद्य:स्थिती पाहण्यासाठी ‘इंटिग्रेटेड डॅशबोर्ड’ विकसित केला जात आहे. यामुळे तक्रारीचे निराकरण कधी झाले, किती वेळ ती प्रलंबित होती, बुजविलेल्या खड्ड्यांबाबत तक्रारदार समाधानी आहे का, आदी आढावा या ‘डॅशबोर्ड’द्वारे पालिकेला कळू शकणार आहे.
पावसाळ्यात नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागू नये, यासाठी पालिकेकडून दि. १० जूननंतर रस्त्यांची कोणतीही कामे हाती घेतली जाणार नाहीत. त्यादृष्टीने पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्यावर पालिकेचा भर असून, या कामांचा सातत्याने बांगर आढावा घेत आहेत.
नागरिकांनी अशी नोंदवावी तक्रार-
१) पालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांच्या तक्रारीसाठी पालिकेने ‘MyBMC Pothole FixIt’ हे ॲप विकसित केले आहे.
२) ‘१९१६’ क्रमांकावरही नागरिकांना तक्रार करता येणार असून, हा क्रमांक २४ तास अव्याहतपणे कार्यरत असतो.
३) पालिकेच्या @mybmc या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्वीटर) अकाउंटला टॅग करूनही तक्रार नोंदविता येईल.
४) दुसरीकडे पावसाळ्यात खड्डे पडल्यास ते विनाविलंब दुरुस्त व्हावेत, यासाठी पालिकेच्या अभियंत्यांनी स्वतःहून खड्डे शोधून काढावेत, तसेच ते २४ तासांत बुजविणे आवश्यक आहे.
५) त्याचवेळी नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यांच्याकडून येणारा प्रतिसाद पालिकेसाठी महत्त्वाचा आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन खड्डे भरण्याची कार्यवाही विनाविलंब केली जाईल, यासाठी पालिका दक्ष राहील, असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला.
…या खड्ड्यांवरही असणार लक्ष
पालिकेच्या अखत्यारित असणाऱ्या रस्ते, पदपथांची डागडुजी पालिकेकडून नियमित केली जाते. मात्र मुंबईतील काही रस्ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या अखत्यारितील आहे. त्यांच्या रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांवरही पालिकेचे लक्ष असणार आहे.