टेंभुर्णी : गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व रोहिणी व मृग नक्षत्राच्या पावसाने उजनी धरण पाणलोट क्षेत्रासह माढा तालुक्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
या पावसामुळे उन्हाळ्यात जतन करून ठेवलेल्या चारा पिकांसह फळबागांना जीवदान मिळाले आहे, तर उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसाने धरणाची पाणी पातळी गेल्या तीन दिवसांपासून स्थिर राहिली आहे.
पाणलोट क्षेत्रात तीन दिवसात २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वजा ५९.९९ टक्के वरती पाणी पातळी स्थिर राहिली आहे. माढा तालुक्यात एकूण सरासरी २६२.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
माढा तालुक्यात काही ठिकाणी ओढे, नाले, ताली तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. खरीप पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी खरीप पिकांच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. सोलंकरवाडीचा पूल वाहून गेला मोडनिंब मंडलात सर्वाधिक पाऊस झाला असून माढा तालुक्यातील सोलंकरवाडी येथील पूल पावसाने वाहून गेला आहे.
बियाणे वेळेत देण्याची मागणी मान्सूनपूर्व पावसाने माढा तालुक्यात समाधानकारक हजेरी लावल्याने खरीप पेरणीला वेग येणार आहे. यामुळे शासनाने सोयाबीन, उडीद, मूग, तूर, मका, बाजरी आदी खरीप हंगामातील बियाणे वेळेत पोहोच करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर
सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरणाची जून महिन्याच्या सुरुवातीला पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने पाणी पातळी स्थिर राहिली आहे. ५ जून रोजी वजा ५९.९१ टक्के पाणी पातळी होती. दररोज ०.१० टक्के पाणी पातळी घटत होती. ४ जून रोजी सायंकाळी १० मिलिमीटर, ५ जून रोजी १ तर ६ रोजी १५ मिलिमीटर असा एकूण २६ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात ३१.५२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे