छत्रपती संभाजीनगर : भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची किमान ७५ टक्के हजेरी आवश्यक आहे. पण, हा नियम किती विद्यार्थी आणि महाविद्यालये अमलात आणतात, याची खातरजमा करण्याचा निर्णय आता समाज कल्याण विभागाने घेतला आहे.
त्यामुळे बोगस हजेरीपट दाखल करणाऱ्या महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षात आतापर्यंत जिल्ह्यातील ६१ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप झाले असून ८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहेत.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा, यासाठी भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. गेल्या शैक्षणिक वर्षात (सन २०२२-२३) जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या २९ हजार ४५४ आणि एनटी, ओबीसी, एसबीसी प्रवर्गाच्या ३७ हजार ८८७ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला होता. चालू शैक्षणिक वर्षात (सन २०२३-२४) आतापर्यंत दोन्ही मिळून ७० हजार ६३५ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडे प्राप्त झाले असून अजूनही ८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये अडकले आहेत.
विशेष म्हणजे, महाविद्यालयांनी ७५ टक्के हजेरीबाबत दिलेल्या पत्रावर विश्वास ठेवून समाज कल्याण कार्यालयाकडून शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. मात्र, जिल्ह्यात अशी काही महाविद्यालये आहेत, जिथे प्रवेश घेतल्यावर थेट परीक्षेलाच विद्यार्थी जातात. विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाकडून मिळणाऱ्या शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्कावर काही महाविद्यालये सुरू आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर आता समाज कल्याण जिल्हा कार्यालयाने हजेरीची खातरजमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
परिपूर्ण अर्जासाठी शनिवारपर्यंतची मुदत
सद्य:स्थितीत अनु. जातीच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जांपैकी २७ हजार ७८१ अर्ज महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाकडे फॉरवर्ड केले असून, प्राप्त अर्जांपैकी २७ हजार ८९ अर्ज समाज कल्याण विभागाने मंजूर केले आहेत, तर एनटी, ओबीसी, एसबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जांपैकी ३४ हजार ४४० अर्ज महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाकडे पाठविले. त्यापैकी ३४ हजार ३८९ अर्ज मंजूर झाले आहेत. यापैकी ६१ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप झाले आहे. आता शनिवारपर्यंत उर्वरित विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत आहे.