अहमदनगर, साहेबराव कोकणे: खासदार निलेश लंके त्यांच्या एका कृतीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत. निलेश लंके यांनी सत्कार तर घेतला मात्र गजा मारणे कोण हे माहिती नाही असा अजब दावा केला आहे.
निलेश लंके यांनी गजा मारणेची भेट घेतली आणि त्यांनी दिलेला फुलांचा गुच्छही घेतला. त्यामुळे त्यांच्या भेटीनं चर्चांना उधाण आलं. या भेटीनंतर मात्र निलेश लंके यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे.
कुख्यात गुंड गजा मारणे याची अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी भेट घेतली. ते दिल्लीवरून येत असताना पुण्यामध्ये काही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घरी भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी परत येत असताना माझी गाडी पाहून त्या व्यक्तीने हात केला. साहेब मी इथेच रहातो चहा घेण्यासाठी चला म्हणून मी त्यांच्या घरी गेलो.
त्यांनी घरी गेल्यावर माझा सत्कार केला परंतु ती व्यक्ती कोण आहे याची मला कल्पना मला नव्हती. आज सकाळी काही प्रसार माध्यमांतून कळाले की तो गजा मारणे होता, त्याची मला पार्श्वभूमी माहीत नसल्यामुळे आणि अशा व्यक्तीच्या घरी जाणं ही चूकच असल्याचं खासदार निलेश लंके म्हणाले.
निलेश लंके हे अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर महाविकास आघाडीकडून त्यांना लोकसभेचं तिकीट देखील देण्यात आलं.
महायुतीकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. निलेश लंके यांनी सुजय विखे यांच्यापुढे मोठं आव्हान निर्माण केलं होतं. अखेर या अटीतटीच्या लढतीमध्ये सुजय विखे यांचा पराभव झाला.लंके यांनी बाजी मारली. मात्र आता त्यांनी गुंड गजा मारणेची भेट घेतल्यानं ते वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.