पालखी सोहळ्यासाठी सरकारचा निधी मिळेपर्यंत डीपीसीतून खर्च करा, अजित पवार यांचे निर्देश

Khozmaster
3 Min Read

पुणे : राज्य सरकारकडून पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणारा निधी प्राप्त होईपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

विधान भवनात आयोजित श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळ्याचा पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार दिलीप मोहिते पाटील, संजय जगताप, दत्तात्रय भरणे, समाधान आवताडे, बबन शिंदे, संजय शिंदे, सुनील कांबळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, वरिष्ठ पोलिस अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते.

पवार म्हणाले, “पालखी सोहळ्यासाठी फिरते शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. सोहळ्याच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांची अधिकाऱ्यांनी नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. पालखी सोहळा चांगल्या रितीने संपन्न व्हावा यासाठी सरकार व प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल. सर्व विभाग सकारात्मक राहून सोहळा यशस्वी करण्यासाठी काम करतील.”

पुलकुंडवार म्हणाले, “यंदा फिरते शौचालय आणि स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अधिक संख्येने ठेवण्यात आले आहेत. रस्त्याची सुरू असलेली कामे पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत.

पुणे जिल्ह्यात तयारी अंतिम टप्प्यात

दिवसे म्हणाले, “पालखी सोहळ्यासाठी ३ हजारांपेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेजुरी पालखी तळाची कामे सुरू करण्यात आली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार ८००, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार २०० आणि संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी २५० शौचालयांची सुविधा करण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी २०० पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली असून ४५ ठिकाणी पाणी भरण्याची सुविधा असणार आहे. ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे. ११५ आरोग्य पथके, ५७ फिरते वैद्यकीय पथक आणि १७९ रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सुविधा करण्यात येणार आहे. १२ ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात येईल.

बैठकीला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री संत सोपान महाराज पालखी सोहळा, श्री संत निळोबाराय संस्थान, श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *