मुंबई : वृद्ध नागरिकांवर होणारा अत्याचार चिंतेचा वाढता विषय आहे. वृद्धांची घसरती आर्थिक स्थिती आणि कमी कार्यक्षमतेमुळे त्यांना वाईट वागणूक दिली जाते. अशात त्याच्यावर कुटुंबातील सदस्यांकडून अत्याचार, अपमान केला जातो.
ज्यामुळे वृद्धांना घरातच असुरक्षितता वाटू लागली आहे. दिवसेंदिवस अत्याचाराचा अनुभव ज्येष्ठांमध्ये वाढत असल्याचे ‘हेल्पएज इंडिया’च्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
वृद्धांसाठी काम करणाऱ्या ‘हेल्पएज इंडिया’ या सेवाभावी संस्थेने १५ जून ‘जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिना’च्या पूर्वसंध्येला आपला राष्ट्रीय अहवाल प्रसिद्ध केला. यानिमित्त मुंबई मराठी पत्रकारसंघात शुक्रवारी हेल्पएज इंडियाचे राज्य प्रकल्प सहसंचालक वलेरियन पैस, माजी महापौर निर्मला सावंत प्रभावळकर, पालिका मुख्य सामाजिक विकास अधिकारी भास्कर जाधव, प्रा. साईगीता चित्तुरा यांनी माध्यमांशी संवाद साधला.
प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे मत आणि सन्मान असतो. नात्यातील अधिकारात अनेकदा त्याचा विसर पडतो. आपली मते किंवा निर्णय लादणे हे सुद्धा शोषण असते. शारीरिक शोषणाबरोबर मानसिक, वैचारिक शोषण सुद्धा केले जाते. – प्रा. साईगीता चित्तुरा, टाटा सामाजिक संस्था
१) अहवालानुसार भारतात लाखो ज्येष्ठ नागरिक त्यांच्या उतरत्या आयुष्यात सन्मानाने जीवन जगण्यासाठी इतरांवर जास्त अवलंबून आहेत. हेल्पएज इंडियाने त्यासाठी दहा राज्यांमधील २० मोठ्या शहरांमध्ये अभ्यास केला.
२) ५१६९ वृद्ध आणि १३३३ काळजीवाहू कुटुंबातील प्राथमिक सदस्यांचे सर्वेक्षण केले आले. हेल्पएज इंडियाचे राज्य प्रकल्प सहसंचालक वलेरियन पैस यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत महापालिकेच्या माध्यमातून विरुंगळा केंदे, समुपदेशन, डे केअर सेंटर सुरू झाले आहेत.