मराठा समाजासाठी काय केले ते आक्रमकपणे मांडा, भाजपच्या मराठा आमदारांना बैठकीत सूचना

Khozmaster
1 Min Read

मुंबई – मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने आणि सध्याच्या शिंदे सरकारने खूप काही केले; पण ते मराठा समाजातील लोकांना समजावून सांगण्यात आपण कमी पडलो. यापुढे आक्रमकपणे त्याबाबतची बाजू मांडा अशी सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजातील भाजप आमदारांच्या बैठकीत शुक्रवारी केली.

मराठा समाजाला आमच्या सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकणार नाही असे फेक नॅरेटिव्ह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तयार केले आणि सर्वत्र त्याबाबतचा अपप्रचार केला. आरक्षण

टिकण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न आपले सरकार सर्वोच्च न्यायालयात करत आहे. कुठलीही कसर आपण सोडलेली नाही. असे असताना आपल्याबाबत बुद्धिभेद करण्यात महाविकास आघाडीचे नेते यशस्वी झाले. त्याला प्रत्युत्तर देण्यात आपण कमी पडलो, असे बावनकुळे म्हणाले. सारथीच्या माध्यमातून आपल्या सरकारने मराठा समाजाच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या, तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवण्यात आल्या. हे सगळे आपण समाजात सांगितले पाहिजे त्या दृष्टीने कामाला लागा, असे आवाहन पाटील आणि बावनकुळे यांनी केले. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा फटका आपल्याला बसला. या समाजासाठी खूप काही करूनही केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खोटे पसरविले. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत त्यांचा अजेंडा पुन्हा यशस्वी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *