ठाणे : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, शनिवारी सकाळी, महापालिकेच्या वर्तकनगर येथील एकच प्रांगणातील शाळा क्रमांक ४४, ४०, ३० आणि २० मधील विद्यार्थ्यांचे महापालिका आयुक्त सौरभ राव विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
तसेच, सावरकर नगर येथील शाळा क्रमांक १२० मध्येही आयुक्तांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी, विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व उपक्रमात सहभागी व्हावे, भरपूर अभ्यास करावा आणि आईवडिलांना समाधान मिळेल असे यश मिळवावे, असे आयुक्त राव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे शाळांचे रूप बदलले जात आहे. त्याचा विद्यार्थी आणि शिक्षक यांना फायदा होईल, असेही आयुक्त राव म्हणाले.
विद्यार्थ्यांचे स्वागत केल्यावर काही वर्गांमध्ये जावून आयुक्त राव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. नवीन कोरी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्याना दिली. यावेळी, माजी ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के, अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त (शिक्षण) सचिन पवार, गटाधिकारी संगीता बामणे, शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.