मान्सूनची गती मंदावली; अजून तीन ते चार दिवसाची पाहावी लागेल वाट

Khozmaster
2 Min Read

मॉन्सून दोन दिवसांपासून अमरावती, चंद्रपूर भागातच मुक्कामी आहे. त्याची पुढची वाटचाल मंदावलेली आहे. आतापर्यंत मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मजल मारली आहे.

परंतु, दोन दिवसांपासून मॉन्सूनमध्ये प्रगती झालेली दिसत नाही.

अजून तीन-चार दिवस तरी प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड या घाट विभागात वादळवाऱ्यासह पावसाचा इशारा दिल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.

सध्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी विदर्भातील अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत मजल मारलेली आहे. पण त्यानंतर मॉन्सूनची चाल मंदावलेली पाहायला मिळत आहे. वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागेल.

मोसमी वाऱ्यामध्ये ऊर्जा नसल्याने ते भरून येण्यासाठी वेळ लागेल. खरंतर यंदा अरबी समुद्रावरून मॉन्सूनचा प्रवास वेगाने झाला होता. केरळमध्येदेखील दोन दिवसांपूर्वी हजेरी लावली. त्यानंतर मॉन्सून महाराष्ट्रात ६ जून रोजी दाखल झाला, तर ८ जून रोजी पुणे, धाराशिव, नांदेड, लातूर या जिल्ह्यांच्या काही भागात पोहोचला.

९ जून रोजी मुंबईसह, ठाणे, पुणे, नगर, बीड जिल्ह्यांच्या बहुतांश भागात मजल मारली. आता तर मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापला आहे. विदर्भामध्ये बुधवारी (दि. १२) पश्चिम विदर्भाच्या आणखी काही भागात मॉन्सून पोहोचला होता. १४ जूनपर्यंत वाटचाल सुरू होती. पण दोन दिवसांपासून ती मंदावलेली आहे.

सध्या बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनचे प्रवाह क्षीण झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच अरबी समुद्रावरून मॉन्सूनची वाटचाल मंद झाली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मॉन्सून पुढे वाटचाल करण्यासाठी पोषक वातावरण तयार होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. १७ ते १९ जून रोजी विदर्भातील सर्व जिल्हे, नांदेड वगळता सर्व मराठवाडा, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर या भागात वादळवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. रायगड, सिंधुदुर्ग, सातारा घाट विभागात येलो अलर्ट आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *