लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रानेभाजपाला जोरदार धक्का दिला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षांना एकत्र घेऊन ‘फिर एक बार ४० पार’चा नारा भाजपाने दिला होता.
पण, महायुती २० च्या पुढेही जाऊ शकली नाही. भाजपाचीही पुरती दाणादाण उडाली. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत, “मला सरकारच्या कामातून मुक्त करा आणि पक्षाचं काम करू द्या”, अशी इच्छा व्यक्त करणारे देवेंद्र फडणवीस आजही आपल्या त्याच भूमिकेवर ठाम असल्याचं समजतं. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत होणाऱ्या बैठकीत ते आपला हाच मनोदय पुन्हा बोलून दाखवतील, असं निकटवर्तीयांनी सांगितलं. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह काय भूमिका घेतात, याबद्दल उत्सुकता आहे. महाराष्ट्रात पक्षाची धुरा फडणवीसांकडे देऊन पुढच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढवल्या जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.