अप्पम हा एक केरळ मधील खास लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे .यालाच पलप्पम अशा नावानेही ओळखले जाते . हे खास करून तांदूळ भिजवून आंबवून नारळाचा वापर करून गुळ घालून बनवले जातात . आजकाल सर्वांनाच झटपट नाश्त्यासाठी काहीतरी हवे असते . म्हणून आपण तांदुळा ऐवजी रव्याचा वापर करून अप्पम बनवूया .केरळात रात्रीच्या जेवणात , नाश्त्याला किंवा अगदी उत्सवातही अप्पम आवर्जून बनवून प्रसाद म्हणूनसुद्धा अतिशय आवडीने बनवून खाल्ले जातात . गरम गरम खाण्यात काही औरच लज्जत असते
चला मग पाहूया..
साहित्य :
1 वाटी रवा , अर्धी वाटी गव्हाचे पीठ , अर्धी वाटी तांदूळाची पिठी , 1 वाटी नारळाचे तुकडे ,1 वाटी गुळ. .गुळाची पावडर किंवा साखर ,1 चिमूटभर मिठ, 1 चमचा वेलची पावडर , पाऊण वाटी दूध , 1 चिमूटभर दालचिनी पावडर , 1 चिमूटभर बेकिंग सोडा , 2 चमचे तूप , आवडेल ते तेल. .कोकोनट. . रिफाईड ,साजूक तूप ही खूपच सुरेख लागते .2 केळी , ड्रायफ्रटसचे बारीक तुकडे .
कृती :
प्रथम रवा शक्यतो बारीक असेल तर उत्तम.. चिमूटभर मिठ घालून 1 कप पाण्यात 15..20 मिनिटे भिजवून ठेवावा . मग मिक्सरमधून नारळाचे तुकडे आधी एकदम बारीक वाटून घ्यावेत .मग त्यातच गुळ घालून पुन्हा फिरवावे आणि परत त्यात दूध घालून छान फिरवावे .
सर्व मस्त एकजीव झाले की त्यात पिकलेली केळी घालून पुन्हा छान फिरवावे . मग हे सर्व मिश्रण भिजलेल्या रव्याच्या बॅटर मध्ये घालावे .
ते व्यवस्थितपणे मिक्स करून त्यात गव्हाचे पीठ व तांदूळाची पिठी घालून थोडे थोडे पाणी घालून फेटावे. साधारण भज्याच्या पिठापेक्षा किंचित सैलसर बॅटर बनवावे व त्यात चिमूटभर बेकिंग सोडा व स्वादासाठी आवडत असेल तर पावडर घालावा . व हलके लागेपर्यंत मस्त फेटावे .
आता गॅसवर मध्यम आकाराची कढई ठेवून त्यात थोडेथोडे तेल किंवा तूप घालत ते व्यवस्थित गरम झाले की एक डाव भरून बॅटर घालावे . खालच्या बाजूने तांबूस रंग आला की ते झाऱ्याने उलटावे व पुन्हा छान फ्राय करावे . हे उलटले की मस्त टम्म फुगतात . गोल्डन रंग आला की तारेच्या चाळणीत काढावेत . तेल पूर्णपणे निथळले की त्यावर पिस्ता ,काजू ,बदाम यांची बारीक पूड किंवा तुकडे यांनी सजवून खाण्यास द्यावे . हे गरम गरम खाण्यात तर खूपच मजा आहे .
वैशिष्टय:
दररोज खायला काय करावे हा बऱ्याचवेळा प्रश्नच असतो . त्यासाठी हा मस्त पर्याय आहे . यातील केळी, वेलची पूड , गुळ आणि नारळ याचा एकत्र स्वाद खूपच सुरेख लागतो . साजूक तूप असेल तर मग विचारायलाच नको . नारळ , दूध यामुळे एकदम सॉफ्ट ,लुसलुशीत बनतात . खूप गोड सुद्धा नसतात त्यामुळे भरपूर व पोटभर खाऊ शकतो . शेजारी लिंबाचे लोणचे तोंडी लावण्यासाठी असले की मग काय विचारायलाच नको . गोडसर असल्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही , शिवाय एकदम हेल्दी डिश आहे . कुणी यात खोबऱ्याचे, काजू ..बदामाचे एकदम बारीक तुकडे करून ते तुपावर रोस्ट करून कुडकुडीत करून बॅटर मध्ये घालतात . मधून मधून थोडे क्रन्ची मस्त लागतात .
सौ .स्नेहा मुसरीफ ,पुणे .
Users Today : 43