छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
लातूर : लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भांबरी, बसवंतपूर, वरवंटी परिसरातील अवैध हातभट्टी दारु विक्री करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी केली आहे.
लातूर शहरापासून जवळच असणाऱ्या भांबरी, बसवंतपूर, वरवंटी व परिसरात हातभट्टीच्या दारूसह अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री सुरू आहे. या परिसरात तब्बल ३० हातभट्टी दारू विक्रीची दुकाने आहेत. ही अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी, या मागणीसाठी प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली भांबरीपासून एमआयडीसी पोलीस ठाण्यापर्यंत शेकडो महिला – नागरीकांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पीव्हीआर चौक- एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर आल्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पोलिसांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, भांबरी – बसवंतपूर व परिसरात हातभट्टी दारू व गांजा विक्रीची एकूण ३० दुकाने आहेत. या माध्यमातून दररोज सात लाखांची आर्थिक तर वार्षिक तब्बल २३ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होते. अवैध दारू – गांजा विक्रीमुळे व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गोरगरीबांचे संसार उध्वस्त झाले असून मागच्या दिड वर्षात या दारूच्या सेवनाने १०० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दारू व गांजा विक्री बंद करण्याच्या मागणीचे निवेदन आतापर्यंत अनेकवेळा एमआयडीसी पोलिसांना देण्यात आले आहे. मात्र त्यावर अद्याप पर्यंत कोणतीही
कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वात पाच किमी. अंतराचा हा लक्षवेधी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरीकांसह महिला, लहान मुलेही सहभागी झाले होते.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी मोर्चासमोर येऊन निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने ठाण्यासमोर तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या ठिय्या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने पोलीस निरीक्षक नरवडे यांनी निवेदन स्विकारून अवैध दारू – गांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांसह राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस अमोल नानजकर, प्रदेशाध्यक्ष पंडित तिडके, महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. राणीताई स्वामी, प्रदेश उपाध्यक्ष गिरे पाटील, किसन सारगे, जिल्हाध्यक्ष राजेश पवार, नेताजी जाधव, आदित्य कासले, तुषार रेड्डी, सुवर्णा नाईक, सुनील शिंदे, लक्ष्मण दणाने, त्रिशला गिरी, काशीबाई हांडे, जयश्री भूतेकर, योगीता ठाकूर, प्रिती कोळी, मोक्षदा भंडारकवठे, आकाश गडगळे, भारती सूर्यवंशी, अनिता बिराजदार, शितल तम्मलवार, निळकंठ बप्पा साळुंके, श्रावण रावणकुळे, अॅड. मनोज तिगाडे, गणेश पाटील, काशीनाथ शिंदेसह शेकडो नागरीक सहभागी झाले होते.