पहूरच्या ‘ वाड्या ‘ वर जित्राबांसोबत लेकरांची गट्टी ; शाळेला मात्र सुट्टी !
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पहूर , ता . जामनेर ( ता . १६ )
‘निसर्ग आमुची शाळा
जित्राब लावती लळा ,
भटकंतीच्या झळा
आयुष्याच्या पेटती ज्वाळा ‘ काहीसं असंच भीषण दृश्य पहूर येथील मेंढपाळांच्या वाड्यावर शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं .
एकीकडे शनिवारी (ता . १५ ) शाळा सुरू झाल्या , सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येऊन चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले .पाठ्यपुस्तके वाटण्यात आली आणि मिठाई तसेच गोड खाऊचा आस्वादही चिमुकल्यांनी घेतला . मात्र दुसरीकडे शेंदुर्णी रस्त्यावरील पॉवर हाउसच्या जवळ असलेल्या दफनभूमी परिसरात मेंढपाळ बांधवांचा मुक्काम असून यांच्या वाड्यावरील चिमुकले मात्र शाळेपासून कोसो दूर आहेत .
शाळेच्या पहिल्याच दिवशी पहूर येथे मेंढपाळ बांधवांच्या मुक्कामी बालरक्षक शंकर भामेरे यांनी भेट दिली असता विजू झिटे , रा . पिंपरखेड , जि . नाशिक यांच्या कुटुंबातील ६ ते १४ वयोगटातील ४ बालक आढळून आली . पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढपाळ बांधवांची शेकडो कुटूंबं दरवर्षी नाशिक जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात दाखल होतात . पाऊस सुरू झाल्यावर ते आपल्या गावी परततात . मात्र या सगळ्यात शैक्षणिक नुकसान होते ते चिमुकल्यांचे . त्यांच्या जीवनातील भीषणता स्पष्टपणे दिसून आली. एकीकडे शाळा प्रवेशोत्सवाचा आनंद तर दुसरीकडे निसर्गाच्या कुशीत शाळेपासून कोसो दूर असणारी निरागस बालकं . केव्हा म्हणणार ती मुलं ‘ स्कूल चले हम ‘ ? हाच खरा प्रश्न आहे .