नागपूर : दुचाकीवरून सात लाखांच्या एमडीची स्मगलिंग, तीन आरोपींना अटक

Khozmaster
2 Min Read

नागपूर : दुचाकीवरून सात लाखांच्या एमडीची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. उमरेड मार्गावरील पवनपुत्र नगर येथील रहिवासी व सख्खे भाऊ रोहन सुरेश ढाकुलकर (२८), शुभम सुरेश ढाकूलकर (३१) तसेच वेदांत विकास ढाकुलकर (२४, नेताजी मार्केट, सिताबर्डी) अशी आरोपींची नावे आहेत.

 

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवनपुत्र नगर परिसरात दुचाकीवरून एमडी नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली होती. मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून एमएच ३१ एफव्ही ८४२७ या दुचाकीवर ट्रीपलसीट जाणाऱ्या आरोपींना थांबविले. त्यांची झडती घेतली असता डिक्कीत ७१.११ ग्रॅम एमडी पावडर आढळली. त्या पावडरची किंमत ७.११ लाख इतकी होती. पोलिसांनी आरोपींकडून दुचाकी, वजनकाटा व रोख २२ हजार असा ८.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना विचारणा केली असता त्यानी तबरेज आलम उर्फ टीपू उर्फ अफरोज आलम याच्या मदतीने एमडीची खरेदी विक्री करत असल्याची कबुली दिली. तिघांविरोधातही हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना तेथील पथकाच्या हवाली करण्यात आले. तर तबरेज आलमचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक कविता ईसारकर, सचिन बढिये, लक्ष्मण चौरे, अजय पौनीकर, शेषराव राऊत, अश्विन मांगे, कुणाल मसराम, समीर शेख, प्रकाश माथनकर, नितीन वासने, पूनम शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अगोदर आरोपींच्या घराची झडती

सापळा रचून आरोपींना अटक करण्याअगोदर पोलिसांनी रोहन व शुभम यांच्या घराची झडती घेतली. तेथे काहीही न आढळल्याने त्यांनी आरोपींचा चुलतभाऊ वेदांतच्या नेताजी मार्केट येथील घरीदेखील शोध घेतला. अखेर आरोपी पवनपुत्र नगर परिसरातच आढळले. तीनही आरोपी एकमेकांचे नातेवाईकच आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *