रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापराने जमिनीचा पोत होतो खराब
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव व सावळदबारा परिसरात रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीचा पोत खराब होतो. या शिवाय अन्य कारणांमुळे जमिनीतील पोषकतत्त्व कमी होतात. त्यामुळे जमिनीची किमान तीन वर्षांत एकदा आरोग्य तपासणी आवश्यक आहे. या द्वारे जमिनीला आवश्यक पोषकतत्त्वांची माहिती होते व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे तालुका मंडळ अधिकारी रमेश गुंडिले यांनी सांगितले. नमुने तपासणीला पाठविताना शेतकऱ्याचे नाव, गट क्रमांक, यापूर्वी घेतलेले पीक नमुने घेतल्याचा दिनांक या बाबी पिशवीवर नमूद करणे आवश्यक असल्याची माहिती दयावी. मातीचा नमुना शेताच्या बांधाजवळून घेऊ नये, साधारणपणने एक ते दीड मीटर अंतर सोडून नमुना घ्यावा. कोणत्याही झाडाजवळाचा नमुना घेऊ नये. शिवाय ज्या भागात जनावरे बांधली जातात तिथल्या मातीचा नमुना घेऊ नये, विहिरीजवळची जागा, दलदलीची जागा, कचरा टाकण्याची जागा या ठिकाणांवरून मातीचा नमुना घेऊ नये. याशिवाय सेंद्रिय खत टाकल्यानंतर दोन ते अडीच महिन्यांपर्यंत तेथील मातीचा नमुना घेऊ नये, असा सल्लाही सुभाष आघाव सिल्लोड उपविभागीय कृषी अधिकारी यांनी दिला आहे.
मातीचे जैविक आरोग्य धोक्यात;
“”‘जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचे विश्लेषण होण्यासाठी तीन वर्षांतून किमान एकदा माती परीक्षण करणे आवश्यक आहे. खतांच्या अनिर्बंध वापराने जमिनीत रसायने मिसळली जातात. मातीचे जैविक आरोग्य धोक्यात आल्याने पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करणारे घटक कमी होतात. याशिवाय अन्य कारणांमुळे जमिनीची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.
रमेश गुंडिले मंडळ अधिकारी सोयगाव कृषी विभाग