मुंबई : ‘नक्कल करायलाही अक्कल लागते,’ ही म्हण अगदी बरोबर आहे. खरं तर ही म्हण बिहारमधल्या अनुराग यादव या कॉपीकॅट विद्यार्थ्याला अगदी चपखल बसते. कारण त्याने स्वतः पोलिसांना सांगितलं, की त्याच्याकडे नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच होती.
त्यानंतरही 21 वर्षांच्या अनुराग यादवला नीट परीक्षेत 720पैकी केवळ 185 गुण मिळाले आहेत. या प्रकरणी बिहार पोलिसांनी आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. नीट परीक्षेचा पेपर असल्याचा दावा करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकला नाही. यात अभिषेक कुमारला 720 पैकी 581, तर तिसरा विद्यार्थी आयुष राजला 720 पैकी 300 गुण मिळाले आहेत.
अनुरागने त्याच्या कबुलीजबाबात म्हटलं आहे, की ‘मी कोटा येथील अॅलन कोचिंग सेंटरमध्ये नीट परीक्षेची तयारी करत होतो. माझे काका सिकंदर यांनी मला सांगितलं, की नीटची परीक्षा पाच मे रोजी होणार आहे. त्यांनी मला कोटाहून परतण्यास सांगितलं. तसंच परीक्षेचा पेपर सेट झाला असल्याचंदेखील सांगितलं. मी कोटाहून परत आलो. परीक्षेच्या एक दिवस आधी मला नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देण्यात आली. त्यानंतर रात्रभर उत्तरं पाठ करण्यास सांगण्यात आलं.’
अनुरागने पोलिसांना सांगितलं, की ‘माझं परीक्षा केंद्र डी. वाय. पाटील स्कूलमध्ये होतं. मी परीक्षा देण्यासाठी गेलो, तेव्हा ज्या प्रश्नांची उत्तरं मी पाठ केली होती, तेच प्रश्न परीक्षेत विचारले गेले होते. परीक्षा संपल्यावर अचानक पोलीस आले आणि त्यांनी मला अटक केली. मी माझा गुन्हा कबूल करत आहे.’ अनुराग परीक्षेच्या एक दिवस आधी एनएचएआयच्या गेस्ट हाउसमध्ये मुक्कामाला होता. त्याला या परीक्षेत 720 पैकी 185 गुण मिळाल्याचं त्याच्या गुणपत्रिकेवरून स्पष्ट होतं. परीक्षेच्या आधी एक दिवस प्रश्नपत्रिका मिळून आणि रात्रभर उत्तरं पाठ करूनही त्याला एवढे कमी गुण मिळाले.
कबुलीजबाबात झाल प्रश्नपत्रिकेच्या किमतीचा खुलासा
परीक्षेच्या एक दिवस आधी प्रश्नपत्रिका लीक झाली होती, असं नीट पेपरफुटी प्रकरणाचा कथित मास्टर माइंड अमित आनंदने कबूल केलं. फुटलेल्या प्रश्नपत्रिका किती रुपयांना विकल्या, याचा खुलासादेखील त्याने केला. अमित आनंदच्या कबुलीजबाबाची एक प्रत मिळाली असून, त्यात विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवस आधी उत्तरं पाठ कशी करायला लावली, हेदेखील सांगितलं आहे. लीक झालेल्या प्रश्नांच्या बदल्यात विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेतले गेले.
बिहारमधल्या चार विद्यार्थ्यांची गुणपत्रिका ‘न्यूज 18’कडे असून त्यात त्यांना कोणत्या विषयात किती गुण मिळाले ते जाणून घेऊ या.
1. अनुराग यादवला केवळ 185 गुण मिळाले. त्याला भौतिकशास्त्रात 85.52 पर्सेंटाइल, जीवशास्त्रात 51.04 पर्सेंटाइल गुण मिळाले. रसायनशास्त्रात 5.04 पर्सेंटाइल गुण मिळाले. यावरून हे स्पष्ट दिसतं, की अनुरागला रसायनशास्त्राचा पेपर कदाचित लक्षात राहिला नसावा किंवा त्याला त्याची उत्तरं पाठ करण्याची संधी मिळाली नसावी.
2. आयुष राजचं परीक्षा केंद्र पाटण्यातल्या डीएव्ही बोर्ड कॉलनीत होतं. त्याला एकूण 300 गुण मिळाले. त्याला जीवशास्त्रात 87.80 पर्सेंटाइल गुण मिळाले; पण भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात त्याची कामगिरी अतिशय खराब राहिली. त्याला भौतिकशास्त्रात 15.52 पर्सेंटाइल, तर रसायनशास्त्रात 15.36 पर्सेंटाइल गुण मिळाले. आयुषला केवळ जीवशास्त्राचा पेपर मिळाला असावा. इतर दोन विषयांची उत्तरं पाठ करण्यासाठी त्याला वेळ मिळाला नाही, असं वाटतं.
3. अभिषेकचं परीक्षा केंद्र पाटण्यातलं के. डी. कॉन्व्हेंट स्कूल हे होतं. त्याला चार जणांच्या तुलनेत जास्त गुण मिळाले. अभिषेकला रसायनशास्त्रात 95.99, भौतिकशास्त्रात 96.40 पर्सेंटाइल गुण मिळाले. जीवशास्त्रात 95.56 पर्सेंटाइल गुण मिळाले.
4. गया जिल्ह्यातला रहिवासी असलेल्या शिवनंदन कुमारचं परीक्षाकेंद्र पाटलीपुत्र इथल्या इंटरनॅशनल कॉलेजमध्ये होतं. त्याला 483 गुण मिळाले. शिवनंदनला जीवशास्त्रात 90.27, भौतिकशास्त्रात 89.75 पर्सेंटाइल मिळाले. रसायनशास्त्रात 86.02 पर्सेंटाइल मिळाले.
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दानापूर नगरपालिकेचा कनिष्ठ अभियंता सिकंदर याचादेखील समावेश आहे.