कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी – आरोग्य सेवेत अधिक सुसूत्रतता यावी – रुग्ण,नागरिकांकडून अपेक्षा
कवठे येमाई दि. २१ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.वैभव अकनगिरे हे एमबीबीएस पदवीधारक वैद्यकीय अधिकारी म्हणून नुकतेच रुजू झाले आहेत.मागील अनेक दिवसांपासून येथील ग्रामस्थांची व खास करून रुग्णांची या पीएचसीत एमबीबीएस डॉक्टर मिळावेत म्हणून मागणी होती. ती मान्य झाल्याने याबाबत पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई यांना धन्यवाद देण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी शक्य झाले तर लवकरच कवठे आरोग्य केंद्रास दुसरेही एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गावठाण व १२ वाड्या वस्त्या व सुमारे १८ हजार लोकसंख्या असलेले अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई हे गाव असून परिसरातील अनेक छोट्या मोठ्या गावातील रुग्ण शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असतात. मध्यंतरीच्या काळात येथील दोन्ही एमबीबीएस डॉक्टारांची इतरत्र नेमणूक झाल्याने येथे बीएएमएस डॉ. नेमण्यात आले. दरम्यानच्या काळात अनेकदा रात्री अपरात्री उपचारासाठी येणारे रुग्ण व बाळंतपणासाठी येणाऱ्या महिला व त्यांच्या कुटुंबियांना अनेकदा वेळेत डॉक्टर,कर्मचारी उपस्थित होत नसल्याने व जलद आरोग्य सेवा न मिळाल्याने नाहक मनस्तापास सामोरे जावे लागल्याची चर्चा ऐकू येत होती. आता कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी आले असून रुग्णांच्या सेवे करीता प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित उपलब्ध राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे यापुढे तरी येथील मोफत शासकीय आरोग्य सेवेत अधिक सुसूत्रता यावी अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य रुग्ण व नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नव्याने रुजू झालेले डॉ.वैभव अकनगिरे यांचे कवठे येमाई ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते किसन हिलाळ यांनी सांगितले.
Users Today : 24