जलयुक्त शिवारमध्ये निधीची वानवा; आता पावसामुळे ठप्प

Khozmaster
2 Min Read

अमरावती : जलयुक्त शिवार टप्पा-२ मध्ये आतापर्यंत जलसंधारण विभागाने सुमारे १५ कोटींची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, उर्वरित कामे निधी व मान्सूनमुळे अडकली. विशेष म्हणजे, या कामासाठी निधीची वानवा आहे.

जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात १६६ कामे पूर्ण झाल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाने दिली आहे. ३० कोटी रुपयांपैकी प्राप्त झालेल्या १५ कोटी रुपयांतून ही कामे केली आहेत. अभिसरणाची ६५७ कामे आटोपली. जलयुक्त शिवार टप्पा दोनअंतर्गत जिल्ह्यासाठी २४० गावांत ४७० कामांचा ३० कोटी रुपयांचा आराखडा तयार केलेला आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना टप्पा दोनची ३० कोटी रुपयांची ४७० व अभिसरणाची ३१८ कोटी रुपये खर्चाच्या ४,२३९ कामांचा आराखडा तयार केला. यासाठी एकूण ३४८ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता.

मात्र, जलयुक्तच्या कामांसाठी १५ कोटी व अभिसरणासाठी १४० कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. जलयुक्तची कामे उन्हाळ्याच्या कालावधीत करता येतात. यंदा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निविदा प्रक्रिया केल्यामुळे कामे करता आली. अद्याप जलयुक्तची ३०३ व अभिसरणाची ४,०५२ कामे अपूर्ण आहेत. सध्या मान्सूनला प्रारंभ झाला असल्याने पुन्हा ही कामे रखडण्याची शक्यता आहे.

विभागनिहाय कामाची विभागणी
जलयुक्त शिवार योजनेतील सर्वाधिक २३३ कामे भूजल सर्वेक्षण विभागाची असून, यापैकी १०३ कामे झाली. कृषी विभागाकडील सातही कामे झाली. वनविभागाने मात्र ९७ पैकी एकच काम पूर्ण केले. सर्व विभाग मिळून एकूण १६६ कामे पूर्ण झाली आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण केल्याने या कामांची पूर्तता करता आली. जलयुक्त शिवारची कामामध्ये मृद व जलसंधारण ४६ पैकी १२, जि. प. जलसंधारण ५७ पैकी २४, जलसंपदा २९ पैकी १८, भूजल सर्वेक्षण २३३ मधून १०३, कृषी विभाग ७ पैकी ७, वनविभाग ९७ पैकी १ आणि सामाजिक वनीकरण १ पैकी १ याप्रमाणे कामे केली आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *