मालवण: सिंधुदुर्गमधीलपर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा या साठी शासनाने कंबर कसली आहे. यासाठी सिंधुदुर्गच्या समुद्रात नौदलाची निवृत्त युद्धनौका बुडविण्याची महत्त्वाकांक्षी योजना तयार करण्यात आली आहे.
पाण्याखालील युद्धनौका प्रमाणित स्कुबा डायव्हर्सच्या माध्यमातून पर्यटकांना पाहता येणार आहे. जागतिक पर्यटन संकल्पनेच्या धर्तीवर हा भारतातील पहिलाच प्रयत्न असून समस्त सिंधुदुर्गवासियांसाठी ही अभिमानाची बाब ठरणार आहे.
सिंधुदुर्गात सुरुवातीला स्कुबा डायव्हिंग च्या माध्यमातून पर्यटनाला सुरुवात झाली. मात्र हे स्कुबा डायविंग आंतरराष्ट्रीय दर्जाचे नव्हते. भविष्याकडे पाहता सिंधुदुर्गात पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि रोजगार वाढीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा एखादा पर्यटन प्रकल्प साकारणे गरजेचे होते.
याच अनुषंगाने युरोप आणि अमेरिकेत ज्याप्रमाणे निवृत्त युद्धनौका स्कुबा डायव्हिंग द्वारे पर्यटनासाठी समुद्राच्या पाण्याखाली बुडविल्या जातात. त्याच प्रमाणे सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाण्याखालील एक नाविन्यपूर्ण आकर्षण निर्माण व्हावे आणि ते दर्जेदार स्कुबा डायव्हर्सच्या मदतीने पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध व्हावे असे शासनाच्या विचाराधीन होते. यावर मागील काही महिन्यात अनेक पातळ्यांवर काम सुरू होते.
एमटीडीसीच्या प्रस्तावाला नौदलाकडून मान्यता..
- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने भारतीय नौदलाकडे पर्यटनासाठी निवृत्त युद्धनौकेची मागणी केली होती.
- निवृत्त झालेल्या युद्धनौका भंगारात पाठविण्यातची पद्धती आहे. मात्र यामुळे त्या युद्धनौकेचा गौरवशाली इतिहास नष्ट होत असतो.
- समुद्रात स्कुबा डायव्हिंग साठी कृत्रिम प्रवाळ क्षेत्र निर्माण व्हावे म्हणून परदेशात निवृत्त युद्धनौका समुद्रात बुडवल्या जातात.
- पाण्यात बुडविलेल्या या युद्ध नौकांवर समुद्रातील कवचधारी जीवांचे थर साठतात.
- अशा युद्ध नौका शेकडो वर्ष पाण्यात खाली टिकून राहतात आणि त्यांचा इतिहास जपला जातो. तारकर्ली येथे संपन्न झालेल्या नौदल दिनाच्या वेळी नौदल अधिकाऱ्यांना ही संकल्पना समजावून सांगितल्या आली होती.
- ही संकल्पना ऐकल्यानंतर नौदल अधिकारी प्रभावीत झाले होते.
सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न साकार होणार याचा आनंद: डॉ कुलकर्णी..
- २००५ साली आयएनएस विराट ही निवृत्त युद्धनौका पर्यंत पर्यटनासाठी सिंधुदुर्गच्या समुद्रात बुडण्याची योजना दुर्दैवाने पूर्ण होऊ शकली नाही. मात्र शासनाच्या या नव्या प्रकल्पामुळे जिल्ह्याचे पर्यटन आणि सागरी जैवविविधता वाढीस लागणार आहे. जिल्ह्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
- प्रतिवर्षी शंभर ते दीडशे कोटींच्या अर्थव्यवस्थेत वाढ होणार आहे. असा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यास पुढाकार घेतल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण जेष्ठ नेते, खासदार नारायण राणे, मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचलनालयाचे श्रद्धा जोशी शर्मा, डॉ. बी. एन. पाटील तसेच इसदाच्या संपूर्ण टीमचे सहकारी यांचे सहकार्य लाभले. या उपलब्धि बद्दल सिंधुदुर्गवासीयांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्गाच्या सागरी पर्यटनाचे जनक असलेल्या डॉ. सारंग कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना दिली.