पुणे जिल्ह्यातील २३३ गावे बिबट प्रवण; जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील गावांचा समावेश

Khozmaster
2 Min Read

पुणे :जुन्नर वनविभागातील गेल्या पाच वर्षांतील बिबट्यांच्या हल्ल्यात मानवी मृत्यूच्या १६ घटना घडल्या आहेत, तर ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील २३३ अतिसंवेदनशील गावांना ‘संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे.

 

जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर या चार तालुक्यांचा जुन्नर वन विभागामध्ये समावेश असून, त्यात जुन्नर, ओतूर, मंचर, बोडेगाव, खेड, चाकण व शिरुर या सात वनपरिक्षेत्रांचा समावेश आहे. जुन्नर वन विभागाचे बहुतांश क्षेत्र डोंगराळ असून, यामध्ये पाटबंधारे विभागाचे सिंचन प्रकल्प आहेत. यात प्रामुख्याने घोड व कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे, माणिकडोह, पिंपळगाव जोगे, बडन, चिल्हेवाडी, चासकमान असे मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्प असल्याने सिंचन सुविधेत वाढ झालेली आहे.

डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेमार्फत जुन्नर वनविभागाच्या हद्दीत करण्यात आलेल्या अभ्यासाअंती या क्षेत्रात बिबट्यांच्या संख्येची घनता प्रति १०० चौ. किलोमीटरमध्ये सहा ते सात बिबटे इतकी आढळून आली आहे. या चार तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या अंदाजे ४०० ते ४५० असण्याची शक्यता आहे. जुन्नर वनविभागात मागील पाच वर्षांत बिबट वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकूण ४० गंभीर जखमी व १६ मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत.

या क्षेत्रात बिबट्याचा मानवावरील हल्ला होण्याच्या घटनेत वाढ झाली असून, हे क्षेत्र हे मानव-बिबट संघर्षाचे आपत्ती क्षेत्र झालेले आहे. बिबट वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व मृत्यूच्या घटनेची व्याप्ती लक्षात घेता हे क्षेत्र “संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ घोषित करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *