राज्यात मान्सूनचा पाऊस पोहचून एक महिना उलटला तरीही अनेक भागांत पुरेसा पाऊस पडलेला नाही. मराठवाडा व विदर्भातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असून अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
तर कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार नागपूर विभाग वगळता जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस राज्याच्या सर्व विभागांत पडला आहे. तर कोकणात जून महिन्यात सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडला आहे.
दरम्यान, जुलै महिन्याचा विचार केला तर राज्यभरात सरासरीच्या १४ टक्के पाऊस पडल्याची माहिती महाराष्ट्र शासन आणि कृषी विभागाच्या संलग्न पोर्टल ‘महारेन’वरून मिळाली आहे. तर या माहितीनुसार साधारण पावसापेक्षा कोकण विभागात सर्वांत कमी म्हणजे केवळ १० टक्के पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वांत जास्त म्हणजे १५.५ टक्के पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्ष पावसात आणि आकडेवारीमध्ये फरक
जून महिन्यामध्ये नागपूर विभाग वगळता राज्यातील सर्व विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची आकडेवारी कृषी विभाग देत आहे. पण राज्यातील कोकण आणि सह्याद्री घाट परिसर वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात खूप कमी पाऊस असल्याचं शेतकरी सांगतात. अनेक भागांत कमी पाऊस आणि वापसा नसल्यामुळे पेरण्याही झाल्या नाहीत. पण कृषी विभागाची आकडेवारी ही जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
जुलै महिन्यात कुठे किती झाला पाऊस? (टक्केवारी सरासरीच्या तुलनेत)
- कोकण – १०.७
- नाशिक – १२.९
- पुणे – १३.७
- छत्रपती संभाजीनगर – १५.५
- अमरावती – १५.४
- नागपूर – १६.३