अनधिकृत वीजजोडणी; फेरीवाल्यांना ‘शॉक’: दादर, चेंबूर, मुलुंडमध्ये जोडण्या खंडित

Khozmaster
1 Min Read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने बेकायदा फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई तीव्र केली आहे. या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी पथदिव्यांच्या खांबावरून परवानगीविना वीजजोडण्या घेतल्याचे उघडकीस आले आहे.

त्यामुळे दादर रेल्वेस्थानक परिसर, भायखळा, चेंबूर, बोरीवली, मुलुंड आणि अंधेरी परिसरातील फेरीवाल्यांच्या अनधिकृत वीजजोडण्या गुरुवारी खंडित करण्यात आल्या. तसेच मोठ्या प्रमाणात त्यांची साधनसामग्रीही जप्त केली आहे.

सार्वजनिक रस्त्यांवर पालिकेने पथदिव्यांची व्यवस्था केली आहे. मात्र, याच दिव्यांच्या खांबावरून काही फेरीवाल्यांनी बेकायदा वीज जोडण्या घेतल्या आहेत. तसेच त्यांनी मोठ मोठे, प्रखर झोताचे दिवे लावल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेचे पथक आणि अदानी एनर्जी लिमिटेड यांच्या पथकाने संयुक्तरीत्या या फेरीवाल्यांवर कारवाई केली. यावेळी बेकायदा वीजजोडण्या खंडित केल्या. या कारवाईत पालिका, बेस्ट आणि वीज कंपनीच्या पथकांनी सहभाग घेतला होता.

गुन्हे नोंदविण्यासाठी प्रयत्नशील-

वीज चोरी करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत पालिका प्रशासन, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व बेस्ट उपक्रमाला कळविणार आहे. अशा फेरीवाल्यांवर पोलिसांत गुन्हे नोंदविण्याबाबतही पालिकेकडून कळविण्यात येणार आहे. पालिकेतील सर्व विभाग कार्यालयांतही विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. या पथकात सहायक अभियंत्यांचा समावेश असणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *