आयएएस, आयपीएससह बड्या अधिकाऱ्यांच्या फेक अकाउंटचा सोशल मीडियावर बाजार

Khozmaster
3 Min Read

त्रपती संभाजीनगर : आयएएस, आयपीस अधिकारी, अन्य नामांकित पोलिस अधिकाऱ्यांच्या फेक अकाउंटचा सोशल मीडियावर बाजार उठला आहे. त्यांच्या मूळ फ्रेंड लिस्टमधील लोकांना नव्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते.

यात मिनिटांमध्ये विश्वास जिंकून हजारो रुपयांचा गंडा घातला जातो. दिवसाला किमान तीन अधिकाऱ्यांच्या अशा प्रोफाइल बनत आहेत. सोशल मीडिया हाताळताना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्स ॲपवर येणारी फ्रेंड रिक्वेस्ट जरी खरी असली तरी पाठवणारा तुमचा खरा ‘फ्रेंड’ नाही, याची खातरजमा करा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

५७ वर्षीय सामाजिक कार्यकर्ते अनिलकुमार सोनकांबळे यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांच्या नावे फेसबुक फेक अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट प्राप्त झाली. प्रोफाइल डीपीला पातारे यांचे छायाचित्र, प्रोफाइलमध्ये सविस्तर माहिती असल्याने सोनकांबळे यांनी रिक्वेस्ट स्वीकारली. दि. १ जुलै रोजी त्यांना मेसेज प्राप्त झाला. सीआरपीएफच्या मित्राची जम्मू-काश्मीरला बदली झाल्याने त्याला फर्निचर विकायचे असल्याचे सांगून सोनकांबळे यांचा क्रमांक मागितला. नंबर देताच सोनकांबळे यांना तत्काळ कॉल प्राप्त झाला. विश्वासार्ह संवादानंतर १५ हजारांमध्ये व्यवहार ठरला. आरोपीने पुन्हा दहा हजार रुपये अधिक मागितले. सोनकांबळे पातारेंची प्राेफाइल समजून फेक प्रोफाइलवर खात्री करत त्यांनी सायबर गुन्हेगाराला २५ हजार रुपये पाठविले. काही वेळाने क्रमांक बंद झाल्याने सोनकांबळे यांना संशय आला. निरीक्षक पातारे यांना प्रत्यक्ष संपर्क साधल्यावर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

दिवसाला किमान तीन फेक प्रोफाइल
तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे, वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, अमितेशकुमार, रवींद्र सिंगल, कृष प्रकाश, डॉ. मोहितकुमार गर्ग, मनीष कलवानीया, राकेश ओला, अरविंद साळवे, रवींद्रसिंह परदेशी, नितिन बगाटे, सुनील लांजेवार, संदीप आटोळे, चंद्रकांत गवळी, धनंजय पाटील यांच्यासह शेकडो अधिकाऱ्यांच्या नावे रोज फेक प्राेफाइल तयार करुन फसविण्याचा प्रयत्न होत आहे.

राजस्थान, मध्य प्रदेशमधून रॅकेट
-या गुन्ह्यांच्या सखोल तपासात वारंवार मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणाच्या टोळ्या निष्पन्न झाल्या.
-शहराचे तत्कालीन जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे, प्रशासक जी. श्रीकांत यांच्या गुन्ह्यातही राजस्थानच्या अलवार जिल्ह्यापर्यंत धागेदोरे मिळाले होते.
-मात्र, स्थानिक पोलिसांच्या असहकार्यामुळे पोलिस आरोपीपर्यंत पोहोचू शकत नाहीत.

फेसबुककडून विलंब
या तक्रारींमध्ये सायबर पोलिस सदर अकाउंट बंद करण्यासाठी फेसबुकला आयटी ॲक्ट २००० अंतर्गत ७९-ब नुसार नोटीस पाठविते. पूर्वी बाललैंगिक अत्याचारात फेसबुक पूर्वी ७२ तास, अपहरणात तीन दिवस, अन्य छेडछाडीच्या गुन्ह्यात सात दिवसांमध्ये प्रत्युत्तर मिळायचे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून प्रत्युत्तरच मिळणे बंद झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यंदा शहर पोलिसांकडून फेसबुकला ८४ प्रकरणात ७९-ब ची नोटीस पाठवण्यात आल्या.

प्रत्येकाने सतर्क राहावे
सोशल मीडिया आकर्षक पण धोकायदायक होत आहे. मी दिवसातून किमान सहावेळा स्टेटस ठेवून फेक प्रोफाइल बाबत कळवले. तरीही त्या अकाउंटची फ्रेंड लिस्ट ३५०० पर्यंत पोहोचली. सोशल मीडियावर आपण कोणाशी संपर्क साधतोय याबाबत प्रत्येकाने सतर्क राहायला हवे.
-सुनील लांजेवार, अपर पोलिस अधीक्षक, जिल्हा पोलिस

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *