श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कठुआ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झाले. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी लष्कराकडून शोधमोहीम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सर्वप्रथम परिसराची रेकी केली.
रेकी करून हल्ल्यासाठी अशी जागा निवडली, जिथे वाहनांची गती ताशी १० ते १५ किलोमीटरपेक्षा जास्त राहू शकत नाही. त्यासाठी स्थानिक गाईडने मदत केली. गेल्या महिन्यात रियासीमध्ये झालेल्या हल्ल्याची पुनरावृत्ती करून सैन्याला मोठे नुकसान पोहोचविण्याचा दहशतवाद्यांचा कट होता.
दहशतवाद्यांनी हल्ला करण्यापूर्वी परिसराची माहिती घेत रेकी केली होती. कच्चा रस्ता असल्यामुळे लष्कराचे वाहन हळू जात होते. त्याच वेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यापूर्वीच्या हल्ल्यांप्रमाणे येथेही चालकाला लक्ष्य करण्यात आले. हा कट आखण्यासाठी स्थानिक गाईडने मदत केली होती. दहशतवाद्यांना जेवण दिले, तसेच आश्रयही दिला होता, असा दाट संशय तपास यंत्रणांना आहे.
दहशतवाद्यांकडे होती अत्याधुनिक शस्त्रे
दहशतवाद्यांनी डोंगराळ भाग निवडला. आधी सैन्याच्या ट्रकवर ग्रेनेड फेकला. त्यानंतर स्नायपर गनद्वारे गोळीबार केला. ९ जून रोजी रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसला लक्ष्य केले होते. त्याच प्रकारची योजना होती. त्यावेळी गोळीबारात चालकाला लक्ष्य केले होते. त्यानंतर बस दरीत कोसळली. मात्र, कालच्या हल्ल्यावेळी ट्रक खूप हळू होता. त्यामुळे तो दरीत कोसळला नाही. अन्यथा आणखी प्राणहानी झाली असती.
या हल्ल्यात ३-४ दहशतवाद्यांचा सहभाग होता. ते सर्व पाकिस्तानी होते. काही दिवसांपूर्वी घुसखोरी करून भारतात आले असावे. त्यांच्याकडे अमेरिकेत बनलेली एम-४ कार्बाईड रायफलसारखी अत्याधुनिक शस्त्रे होती. जास्तीत जास्त प्राणहानी झाली पाहिजे, अशा तयारीने त्यांनी कट रचला होता.
लष्कराच्या ताफ्यावर झालेला हल्ला, म्हणजे भाकड कृत्य आहे. याचा तीव्र निषेध करून कठोर प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. प्राणांची बाजी लावणाऱ्या शुरांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
दहशतवादी हल्ल्यात आपल्या पाच शूर सैनिकांच्या मृत्यूमुळे मला अतीव दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त्त करतो. या कठीण समयी संपूर्ण राष्ट्र त्यांच्यासोबत उभे आहे. -राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री.
३ महिन्यांपूर्वीच घरी लक्ष्मीचे आगमन
शहीद जवान विनोद सिंह भंडारी तीन महिन्यांपूर्वीच अठूरवाला या त्यांच्या गावी गेले होते. आज त्यांच्या गावात शांतता पसरली आहे. त्यांच्या पत्नीने तीन महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिला होता. तिला पाहण्यासाठी ते घरी गेले होते. त्यांना ४ वर्षाचा मोठा मुलगा आहे. विनोद यांचे वडिलदेखील सैन्यात होते
दोन महिन्यांत दोन पुत्र गमाविले
शहीद आदर्श नेगी यांच्या कुटुंबीयांवर दुहेरी आघात झाला आहे. नेगी कुटुंबीयांनी दोन महिन्यांमध्ये दोन शूर पुत्र गमाविले आहेत. आदर्श यांचे चुलत भाऊ मेजर प्रणय हे लेह येथे तैनात होते. त्यांचे ३० एप्रिल रोजी निधन झाले. कुटुंबाला दोन महिन्यांत हा दुसरा धक्का बसला आहे.