उत्तर प्रदेशमधील उन्नावजवळ भीषण अपघात झाला आहे. आग्रा-लखनौ एक्सप्रेस वेवर टँकर आणि बसची धडक झाली आहे, या धडकेनंतर बस पलटली आहे. या घटनेत १८ जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातात ३० जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डबल डेकर बस (UP95 T 4720) बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जात होती. पहाटे साडेचार वाजता उन्नावमधील बेहता मुजावर पोलीस स्टेशन हद्दीतील गधा गावासमोर बस आली असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुधाच्या टँकरने तिला ओव्हरटेक केले आणि यादरम्यान बसला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की डबल डेकर बस दोन ते तीनवेळा पलटी होऊन त्याचे दोन तुकडे झाले. या घटनेची माहिती मिळताच डीएम आणि एसपी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती माहिती इतर वाहनचालकांनी दिली. माहिती मिळताच बांगरमाऊचे निरीक्षक पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना उपचारासाठी बांगरमाळ सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी १८ जणांना मृत घोषित केले. गंभीर जखमी प्रवाशांना डॉक्टरांनी लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवले आहे. मृतांमध्ये १४ पुरुष, तीन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसापासून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील जालन्याजवळ समृद्धी महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला होता. रात्री उशिरा झालेल्या या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर चार जण जखमी झाले.