अभिनेत्रीला शिवीगाळ करणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश; ठाणे खंडणीविरोधी पथकाची कारवाई

Khozmaster
2 Min Read

ठाणे : मोबाइल अॅपद्वारे कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या नातेवाइकांना, इतरांना शिवीगाळ करणाऱ्या भाईंदरमधील टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश ठाणे खंडणीविरोधी पथकाने केला. या टोळक्याने कर्ज न घेताही एका अभिनेत्रीसह कुटुंबीयांनाही अश्लील शिवीगाळ केल्याचे उघड झाले.

राहुलकुमार दुबे (३३, रा. विरार, पालघर) याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठाण्यातील घोडबंदर रोड भागात राहणाऱ्या सिनेकलाकार तरुणीला वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन येत होते. फोनवरील व्यक्तीने अॅपवरून लोन घेतले आहे, ते भरा. अन्यथा, फोन येणे सुरूच राहील, अशी धमकी देत शिवीगाळ करीत होती. वारंवार येणाऱ्या फोनला कंटाळून तिने अखेर चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार केली. या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवला. पोलिस निरीक्षक वनिता पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे, भूषण कापडणीस, श्रीकृष्ण गोरे, उपनिरीक्षक विजयकुमार राठोड आणि सुभाष तावडे आदींच्या पथकाने वायरलेस कनेक्ट व्हीआय कंपनीचा सिमकार्ड विक्रेता राहुलकुमार दुबे (३३, विरार) याला ताब्यात घेतले.

लोन वसुलीसाठी धमक्या

या वेळी पोलिसांनी टेलिकॉल सेंटर चालक शुभम ओझा (२९, रा. मीरा रोड) आणि अमित पाठक (३३, मालाड, मुंबई) या फोनवरून बोलणाऱ्या टेलिकॉलरला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांच्याकडे स्लाइस फायनान्स, कोटक बँक, आयडीएफसी फस्ट बँक यांच्या लोन रिकव्हरीचे काम अॅग्रीमेंट करून दिल्याची माहिती उघड झाली.

लोन वसुलीसाठी फोन करून ग्राहकांना शिवीगाळ करून धमकी देत असल्याचे आढळले. इतकेच नव्हे, तर लोन घेणाऱ्या ग्राहकांच्या फोन लिस्टमधील मोबाइल क्रमांकावर फोन करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत असल्याचेही स्पष्ट झाले. या आरोपींकडून संगणकातील 3 चार एसएसडी हार्डडिस्क, एक जीएसएम गेटवे, एक २४ पोर्ट स्विच, एक राउटर आणि तीन मोबाइल असा ७७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

…अशी दिली गुन्ह्याची कबुली

कंपनीने सिमकार्ड विक्रीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे आलेल्या ग्राहकांच्या नावावर दोन ते तीन सिमकार्ड काढल्याचे व त्यापैकी एक सिमकार्ड ग्राहकाला देऊन सिमकार्ड लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटरला विकल्याचीही कबुली दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *