मुंबई : मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली मुंबईतीललोकल रेल्वेसेवा आज, मंगळवारी पाऊस थांबल्यानंतर तरी वेळापत्रकानुसार धावेल आणि चाकरमान्यांचा वेळ वाचेल, अशी आशा होती. मात्र, आजही ती अर्धा तास उशिराने धावत होती.
दरम्यान, लोकल वाहतूक केवळ पाच ते दहा मिनिटेच विलंबाने धावत होती, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला.
पावसामुळे सोमवारी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक कोलमडली होती. हार्बर मार्गावरील लोकल सेवा मंगळवारीच पूर्वपदावर आली. पण मध्य रेल्वे मंगळवारी तरी सुरळीत होईल, ही मुंबईकरांची अपेक्षा फोल ठरली. मध्य रेल्वे प्रशासनाने सकाळी लोकल वेळापत्रकाच्या ५ ते १० मिनिटे विलंबाने मागे धावत होती, असा दावा केला असला तरी रेल्वे स्थानकांवरील चित्र मात्र वेगळे होते. लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत होत्या. सकाळी पिकअवरपासून विलंबाने धावणारी लोकलसेवा दुपारपर्यंत सुरळीत झाल नव्हती.
मंगळवारी दुपारी १२नंतर सीएसएमटीकडे जाणाऱ्या अनेक लोकल दोन स्थानकांदरम्यान रखडल्याचे प्रवाशांचे म्हणणे.
ठाणे, मुलुंड, भांडुप येथे अप धीम्या मार्गावरील लोकल सेवा ३० ते ४० मिनिटे विलंबाने.
१० वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, त्याजागी सामान्य लोकल चालवल्या.
वेगमर्यादा लागू करण्यात आल्याने वेळापत्रक कोलमडले. स्लो लोकल उशिराने. ९० लोकल फेऱ्या रद्द.
१.१७ची गाडी २.२५ ला
विद्याविहार स्थानकावर दुपारी १.१७ वाजता येणारी लोकल २.२५ वाजता फलाटावर आली होती. इंडिकेटरवर दर्शविण्यात आलेली लोकलची वेळ आणि फलाटांवर दाखल होणारी वेळ यात ताळमेळ नव्हता. अन्य स्थानकांवरही हीच अवस्था होती.