सगळ्या आमदारांना आवाहन करतो की, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत. ओबीसीतून आरक्षण द्या, असे सांगण्यासाठी विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीला जायला हवे होते.
हा सगळ्यांचा डाव आहे. मराठ्यांना आरक्षण न देण्यास महाविकास आघाडीचा छुपा पाठिंबा आहे का, अशी थेट विचारणा मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगेंनी केली आहे.
ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील राज्यसभा ठिकठिकाणी दौरे करत असून, सभा, बैठका घेत आहेत. तर, दुसरीकडे सगेसोयरेंचा अध्यादेश काढल्यास मुंबई जाम करू, असा इशारा ओबीसी आंदोलकांकडून देण्यात आला आहे. यावर सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीला जाण्यास नकार दिला. पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी विरोधकांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली.
समाज मागास सिद्ध झाला आहे
प्रश्न लावून धरावा, आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यायचे की नाही हे सगळ्यांनी आम्हाला सांगावे. ओबीसीतून आरक्षण द्या, असे म्हणायला विरोधकांनी जायला हवे होते. एक हाणल्यासारखे आणि दुसरा रडल्यासारखे करत आहे. हा एक मोठा डाव असल्याने समाज रस्त्यावर उतरला आहे. समाज मागास सिद्ध झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला हवे, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.
दरम्यान, १३ तारखेच्या नंतर समाजाची बैठक घेऊन भूमिका जाहीर करू. वारकऱ्यांचे मन दुखेल, असे काही केले जाणार नाही. देवाच्या ठिकाणी आरक्षण आणणार नाही. वारकऱ्यांना त्रास होईल, असा निर्णय घेणार नाही. आरक्षणाची लढाई वेगळ्या मार्गाने लढू. १३ तारखेच्या नंतर बाकी ठरवू, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.