नागपूर: सीबीआयच्या पथकाने बुधवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) परिसरात धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे.
नीरीचे माजी संचालक डॉ.राकेश कुमार यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी सीबीआयचे पथक करत असून त्याच्याशी निगडित काही महत्त्वाची कागदपत्रेदेखील जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सीबीआयने कुमार यांच्यासोबत पाच वैज्ञानिक तसेच पाच खासगी फर्म्सविरोधात गुन्हेगारी षडयंत्र व भ्रष्टाचाराचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
सीबीआयच्या पथकाने बुधवारी सकाळी नीरीत धाड टाकली. त्यांनी विविध कार्यालयांमध्ये कागदपत्रांची तपासणी सुरू केली. आश्चर्याची बाब म्हणजे नीरीतील अनेकांना या प्रकाराची माहितीच नव्हती. दुपारी लंच टाईममध्ये अनेकांना धाड टाकण्यात आली असल्याचे कळाले. नीरीचे माजी संचालक डॉ.राकेश कुमार यांच्या गैरकारभाराबाबत सीबीआयकडे तक्रारी पोहोचल्या होत्या. सीएसआयआरकडूनदेखील सीबीआयकडे तक्रार करण्यात आली होती. राकेश कुमार यांच्या कार्यकाळात केवळ आराखडा बनविण्यात आलेल्या संशोधनांवर पैसे दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
पैसे घेतल्यावर केवळ कागदपत्रे तयार करण्यात आली होती. विभागात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला, त्यातील खर्चावरही आक्षेप घेण्यात आले होते. रिसर्चच्या नावाखाली त्यांनी केलेला सावळागोंधळ, बनावट कंपन्यांच्या नावाने उचललेले कोट्यवधींचे अनुदान इत्यादी आरोपदेखील त्यांच्यावर होते. त्यांना सीएसआयआरने निलंबित केले होते. त्याअगोदर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली होती. या धाडीबाबत सीबीआयच्या अधिकाऱ्यांना कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. नीरीच्या दोन वैज्ञानिकांच्या घरीदेखील धाड पडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे आहेत आरोपी
- – डॉ.राकेश कुमार, माजी संचालक, नीरी
- – डॉ. आत्या कपले, तत्कालीन मुख्य वैज्ञानिक
- -डॉ. रितेश विजय, तत्कालीन प्रधान वैज्ञानिक
- -डॉ. सुनील गुलिया, तत्कालीन फेलो, दिल्ली झोनल सेंटर
- -डॉ. संजीवकुमार गोयल, तत्कालीन वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक
- – अलकनंदा टेक्नॉलॉजी प्रा.लि., ऐरोली, नवी मुंबई
- – मे. एन्विरो पॉलिसी रिसर्च इंडिया प्रा.लि., ठाणे
- – मे. एमेर्जी एन्व्हिरो प्रा.लि., आयआयटी बॉम्बे, पवई
- – मे. वेस्ट टू एनर्जी रिसर्च अँड टेक्नॉलॉजी कॉन्सिल-इंडिया, प्रभादेवी, मुंबई
- – मे. ईएसएस एन्व्हायर्नमेंट कन्सल्टंट प्रा.लि.
- चार राज्यांत सीबीआयकडून छापेमारी
सीबीआयने आरोपींची निवासस्थाने, कार्यालये येथे देखील छापासत्र चालविले. महाराष्ट्रासह हरयाणा, बिहार, दिल्ली येथेदेखील छापे टाकण्यात आले. सीबीआयच्या पथकाने बेकायदेशीर दस्तावेज, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे व ज्वेलरी जप्त केली आहे.
- कंत्राट प्रक्रियेत केला घोळ, सहकाऱ्याच्या पत्नीच्या कंपनीला कंत्राट
पहिला गुन्हा राकेश कुमारविरोधात दाखल करण्यात आला आहे. ठाणे, नवी मुंबई व पवई येथील खाजगी संस्थांना कुमार यांनी बेकायदेशीरपणे प्रक्रिया करत फायदा पोहोचून दिला होता. डॉ.कुमार व डॉ.आत्या कपले यांनी गुन्हेगारी षडयंत्र रचून खाजगी कंपन्यांसोबत एकत्रित बोली लावणे, निविदांचे विभाजन करणे, सक्षम अधिकाऱ्यांची आर्थिक संमती न घेणे, अवाजवी लाभ पदरात पाडून घेणे असे प्रकार केले. नीरीने कुमारच्या कार्यकाळात जारी केलेल्या निविदांमध्ये अलकनंदा टेक्नॉलॉजी प्रा.लि., एन्विरो पॉलिसी रिसर्च इंडिया प्रा.लि. व एमेर्जी एन्व्हिरो प्रा.लि. या तीनही कंपन्या सहभागी झाल्या होत्या व बहुतेक कामे नवी मुंबईतील अलकनंदा या कंपनीला देण्यात आले होते. कुमारसोबत दीर्घकाळापासून काम करत असलेल्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याची पत्नी ही नवी मुंबईच्या कंपनीची संचालक आहे.
- संचालक होण्याअगोदर खाजगी कंपनीतील विश्वस्त
२०१८-१९ या कालावधीत दिवा खर्डी येथील डंपिंग साईट बंद करण्यासाठी सल्लागार सेवा देण्यासाठी नीरी व प्रभादेवीतील खाजगी कंपनीने ठाणे महानगरपालिकेकडे संयुक्त प्रस्ताव सादर केला होता. २०१८-१९ मध्ये संबंधित कंपनीला अवाजवी फायदा मिळवून देण्यासाठी कुमार व इतर आरोपींनी पदाचा गैरवापर केला. आश्चर्याची बाब म्हणजे याबाबत सीएसआयआरच्या आर्थिक सल्लागारांशी सल्लामसलतदेखील करण्यात आली नव्हती. नीरीतील संचालकपदाची जबाबदारी येण्याअगोदर राकेश कुमार २०१५-१६ मध्ये संबंधित खाजगी कंपनीशी संबंधित असल्याचे व तेथील आयोजन समिती तसेच विश्वस्त असल्याचेदेखील आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात राकेश कुमार, डॉ.रितेश विजय यांच्यासह वेस्ट टू एनर्जी रिसर्च अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल-इंडिया या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- ‘वायू-२’च्या उपकरण खरेदीत मोठा भ्रष्टाचार
दरम्यान, तिसरा गुन्हा नीरीतील दिल्ली झोनल सेंटरमधील तत्कालीन सायंटिस्ट फेलो डॉ.सुनील गुलिया व वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ.संजीवकुमार गोयल तसेच नवीन मुंबईतील अलकनंदा व ईएसएस एन्व्हायर्नमेंट कन्सल्टंट प्रा.लि. या दोन खाजगी कंपन्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे. नीरीच्या वैज्ञानिकांना वायूप्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘वायू-२’ हे एअर प्युरिफायर तयार केले होते. याचे पेटंट नीरीकडेच होते; मात्र खाजगी कंपन्यांकडून अवाजवी फायदा मिळवण्यासाठी दोन्ही आरोपींनी गुन्हेगारी कट रचून त्यांच्या अधिकृत पदाचा गैरवापर केला आणि वायू-२ च्या उपकरणांची खरेदी, फॅब्रिकेशन, पुरवठा, स्थापना आणि कार्यान्वित करण्यात अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नीरीकडेच वायू-२चे पेटंट असताना एकल निविदा आधारावर स्वतःच्या तंत्रज्ञानाचे उत्पादन परत मिळवण्याची कृती करत जीएफआर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.