छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील सिल्लोड तालुक्यातील भराडी, आमठाणा, सावखेडा फाटा येथील ठोक बाजारात आवक वाढल्याने हिरव्या मिरचीचे दर गुरुवारी थेट निम्म्यावर आले आहेत. या दरामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
यंदा तालुक्यात मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे बाजारात सर्वाधिक हिरवी मिरची दाखल झाली आहे. एका शेतकऱ्याला एकरी लागवड खर्च ७० ते ८० हजार रुपये लागला आहे. एप्रिल महिन्यात लागवड केलेल्या मिरचीचा दुसरा तोडा तोडणे सुरू आहे.
सुरुवातीचे भाव चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. बाजारपेठेत दररोज मिरचीचे दर घसरत आहेत. परिणामी लागवडीचा खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सुरुवातील १० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिरचीचे दर होते. त्यापाठोपाठ ९ ते १० हजारांपर्यंत दर खाली आले; परंतु गुरुवारी भराडी, आमठाणा, सावखेडा फाटा येथील ठोक बाजारात आवक वाढल्याने चार हजार पाचशे रुपयांवर दर आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. फवारणी, निंदणी, तोडणीचा खर्च जर काढला तर मिरची या दरात विकायला शेतकऱ्यांना परवडत नाही, अशी परिस्थिती आहे.
मिरची उत्पादक शेतकरी तोट्यात
सध्या बाजारपेठेत हिरव्या मिरचीची आवक वाढल्याने दर निम्म्यावर आले आहेत. त्यामुळे मिळेल त्या दराने मिरचीची विक्री करावी लागत आहे. विक्री न झाल्यास तिला फेकून द्यावा लागेल, या भीतीने गुरुवारी शेतकऱ्यांनी मातीमोल दराने मिरीची व्यापाऱ्यांना विकून टाकली. यंदा मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादक शेतकरी तोट्यात आहेत. – रामेश्वर शेजूळ, मिरची उत्पादक शेतकरी, उपळी.
राज्यातील मिरची आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
12/07/2024 | ||||||
श्रीरामपूर | — | क्विंटल | 105 | 2000 | 4000 | 3200 |
पुणे | लोकल | क्विंटल | 830 | 3000 | 5500 | 4250 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 1 | 4500 | 5500 | 5000 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 91 | 4000 | 5000 | 4500 |
रत्नागिरी | लोकल | क्विंटल | 11 | 6600 | 8300 | 7550 |