लातूर : ‘नीट’ प्रकरणी लातुरात गुन्हा दाखल झाल्यापासून इरण्णा मष्णाजी काेनगलवार हा तपास यंत्रणांना गुंगारा देत पसार आहे. अद्यापि त्याचा सुगावा लागला नाही. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश उमरगा येथील औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी प्राचार्य एस.व्ही. माळकुंजे यांनी निर्गमित केले आहेत.
‘नीट’मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवून विद्यार्थी-पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी लातुरात शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात नांदेड एटीएसने दिलेल्या तक्रारीवरुन चाैघांविराेधात गुन्हा दाखल केला हाेता. दरम्यान, यातील दाेन शिक्षकांना पाेलिसांनी अटक केली. तर म्हाेरक्या गंगाधर याला आंध्र प्रदेशातून सीबीआयने अटक केली. सध्या ताे लातुरात सीबीआय काेठडीत असून, त्याची कसून चाैकशी सुरु आहे. आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली. मात्र, इरण्णा काेनगलवार (रा. नाटकर गल्ली, देगलूर, जि. नांदेड) हा सीबीआयलाही गुंगारा देत पसार आहे.
धाराशिव जिल्ह्यात आयटीआयला नाेकरी…
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरगा (जि. धाराशिव) येथे गटनिदेशक (गट-क) म्हणून इरण्णा काेनगलवार कार्यरत हाेता. दरम्यान, ताे गुन्हा दाखल झाल्यापासून स्थानिक पाेलिस, सीबीआय पथकाला चकवा देत पसार आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्याचा अहवाल छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक संचालक पी.टी. देवतळे यांना पाठविण्यात आला आहे.
बीडचे आटीआय राहणार मुख्यालय…
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिले) नियम १९७९ मधील नियम ४ (१) (क) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन ही कारवाई केली आहे. आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत इरण्णा काेनगलवार याचे मुख्यालय औद्याेगिक प्रशिक्षण संस्था, बीड येथे राहील, त्याला निम्न स्वाक्षरीकाराच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय साेडता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.