काल मुंबईत झालेल्या पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच लोकसभेला एकट्या भाजपाच्या सर्व्हेवर जागावाटप झाले आता तिन्ही पक्ष सर्व्हे करणार असल्याचे अजित पवारांनी जाहीर करत विधानसभेचे जागावाटप कसे होणार याचे सूत्र सांगितले.
विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्ष आपापला सर्व्हे करतील, तिघांचेही सर्व्हे समोर ठेवले जातील. जे दोन सर्व्हे एका बाजुला जातील तिथे राष्ट्रवादी आपला उमेदवार देईल, असे अजित पवार गंमतीने म्हटले. यावर बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी आपणही सर्व्हे करणार असल्याचे म्हटले. तसेच ज्यांचे दोन सर्व्हे एकसारखे येतील ते मान्य करून त्यांचा उमेदवार देणार आहोत, असे स्पष्ट केले.
२०१९ ला जिंकलेल्या ५४ जागांवर दावा करणार. या जागांवर नवाब मलिक यांचाही समावेश असणार. तसेच २०१९ मध्ये जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार पुढे होते त्या जागांवरही दावा करणार आहोत, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर अजित पवारांनी आपली भुमिका मांडली आहे. माझ्यासोबतचे आमदार जर परत गेले तर हरकत नाही. नव्यांना उभे करू, आमच्याकडे सध्या अनेक उमेदवार आहेत. अनेकांना संधी दिली ते चांगले काम करत आहेत, असे अजित पवार म्हणाले.
निलेश लंके शरद पवारांसोबत का गेले?
निलेश लंकेंना संधी देण्यासाठी मीच पुढाकार घेतला होता. लंके माझ्याकडून लोकसभा लढविण्यास तयार होते. त्यांना लोकसभा हवी होती. तिथे भाजपाचे खासदार असल्याने भाजपाने लंकेंसाठी जागा सोडली नाही. नगरची जागा धोक्यात असल्याची कल्पना दिली होती. भाजपाने ऐकले नाही. पालकमंत्र्यांनी त्रास दिला यामुळे त्यांच्यासाठी काम करणार नाही अशी लंकेंनी भुमिका घेतली होती. जवळच्या लोकांच्या क्रशर आणि खाणी बंद केल्याने आपल्याला फटका बसेल असे त्यांना वाटत होते, यामुळे लंके शरद पवारांसोबत गेल्याचे अजित पवार म्हणाले.