‘अपयशाने खचून जाऊ नका…’ विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सांगितली महायुतीची रणनीती

Khozmaster
2 Min Read

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला अपयश आलं; पण अपयशाने खचून जायचे नसते. कालच्या विधान परिषदेत आपले दोन आमदार निवडून आले. यश पण पचवायला शिकलं पाहिजे. अपयश आलं तरी लोकांसमोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला.

त्याचबरोबर आजची सभा राष्ट्रवादीची आहे. मात्र, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेतल्या जातील. महायुती आणि मित्र पक्षांच्या सभा प्रत्येक विभागात, जिल्ह्यात होणार आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभा निवडणुकीची रणनीती सांगितली.

बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान महामेळावा आणि जाहीर सभेत पवार यांनी त्यांची रणनीती सांगितली. तसेच महायुतीच्या माध्यमातूनच राष्ट्रवादी निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. विधानसभेचे मतदान होईपर्यंत राष्ट्रवादीची जनसन्मान रॅली थांबणार नसल्याचे देखील पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महायुती आतापासूनच कामाला लागल्याचे या सभेवरून दिसून आले.

लोकसभा निवडणुकीत सहानभुतीचे राजकारण यशस्वी ठरले. यंदा विधानसभा निवडणुकीत देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहानभुतीचे राजकारण पुन्हा डोकावणार असल्याची शक्यता गृहीत धरून बारामतीकरांना आवाहन केले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोणी भावनिक करत असेल तर भावनिक होऊ नका त्यातून विकास होत नाही. बारामती बघत बघत मला महाराष्ट्र फिरायचे आहे, त्यामुळे हे काम माझ्या घरचे नसून सर्वांचे आहे. असे समजून इथल्या माझ्या लोकांनी जबाबदारी पार पाडायची आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

लोकसभेला वेगळे वातावरण निर्माण झाले. आम्ही विकासावर बोलत होतो, त्या सर्वांना बाजूला ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली ती घटना बदलतील, असा खोटा प्रचार केला गेला. तुमच्या-माझ्या महाराष्ट्रात काम करत असताना महिला, पुरुष, वृद्ध, तरुण, मुलींवर अन्याय होणार नाही, असा शब्दही अजित पवार यांनी यावेळी दिला. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत राज्यघटनेला कोण धक्का लावणार नाही. आता कोण असे गैरसमज निर्माण करत असेल तर त्याला ठासून सांगा, आमचा अजितदादांवर विश्वास आहे, ही आपली भूमिका सर्वांना सांगा, असेही अजित पवार म्हणाले. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी लोकसभेतील अपयशाचे मुद्दे यंदा प्रभावीपणे खोडून काढण्याचा प्रभावी प्रयत्न सुरुवातीपासूनच चालविल्याचे दिसून आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *