कवठे येमाई दि. १७ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे आज बुधवार दि. १७ रोजी सायंकाळी मुस्लिम बांधवांनी मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा केला. आज हिंदू बांधवांची आषाढी देवयनी एकादशी अर्थात पंढरपूरच्या विठूरायाची वारी,यात्रा दर्शन सोहळा तर मुस्लिम बांधवांचा मोहरम सॅन एकाच दिवशी आले. मोहरम निमित्ताने आकर्षक सजविलेल्या ताबूताची सायंकाळी सहा नंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या मोहरम सणाचे सर्वत्रच दर्शन घडत असते. हसन व हुसेन यांच्या बलिदाना प्रित्यर्थ मुस्लिम बांधव हा सण सर्वत्र साजरा करीत असल्याचे कवठे जामा मशिदीचे मौलाना अब्दुल रजाक,शरीफ मोमीन,रफीक आतार,माजी प्राचार्य रशिद भाई मोमीन,नूर मोहम्मद पठाण यांनी सांगितले.
सायंकाळी सहाच्या सुमारास येथील ऐतिहासिक राजवाड्यापासून ताबूत मिरवणुकीस सुरुवात झाली. नूरखान पठाण व त्यांचा परिवार ताबूत बनविण्याचे काम परंपरेने गेल्या ५५ वर्षांहून अधिक काळ करीत आहेत. तत्पुर्वी १० दिवस अगोदर या ताबूताची येथील मशिदीमध्ये विधिवत स्थापना करण्यात आली. मोहरम निमित्त आयोजित येथील मिरवणुकीत हिंदू धर्मीय देखील सहभागी झाले होते. पत्रकार सुभाष शेटे,पत्रकार शरीफ मोमीन,शरीफ तांबोळी ,मिठूलाल बाफणा,माजी प्राचार्य रशीद मोमीन,अब्दुल रहेमान तांबोळी,चांद पठाण,रफिक आतार,पप्पू पठाण,पिंजारी परिवार, नूर मोहम्मद पठाण व कुटुंबीय व अनेक हिंदू मुस्लिम बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकी दरम्यान ताबूताला गावठाणातील अनेक भाविकांनी श्रद्धेने खारीक – खोब-याचे तोरण बांधले होते.या वेळी आकर्षक सजविलेल्या ताबूताची गावातून हनुमान मंदिर,काळे आळी ,बाजार तळ मार्गे दत्त मंदिराकडे मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी साडेसातला ताबूतांचे विसर्जन करण्यात आले. सर्वांना प्रसाद म्हणून यावेळी रोट वाटण्यात आले. मिरवणूक अत्यंत शांततेत व उत्साहात पार पडली.