अमरावती: रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे आहे; परंतु रुग्णांना रक्त चढविण्यापूर्वी रक्त सुरक्षित आहे का, याची चाचणी केली जाते. जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीमध्ये सहा महिन्यांमध्ये ४ हजार ४०९ जणांनी रक्तदान केले.
यामध्ये १०३ रक्तदात्यांचे रक्त हे दूषित आढळून आले आहे. यामध्ये ९ जणांना एचआयव्ही असल्याचे आढळून आले आहे. या सर्व दूषित रक्ताची वेळीच विल्हेवाट लावून ते नष्टदेखील करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात वर्षभरात हजारो गरजू रुग्णांना रक्ताची गरज पडते. यामध्ये अपघातग्रस्त, गर्भवती महिला, सिकलसेल, थॅलेसेमिया, तसेच इतरही अनेक गरजू रुग्णांना रक्त आवश्यक असते. त्यामुळे रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात शासकीय रक्तपेढीबरोबरच काही खासगी रक्तपेढ्याही कार्यरत आहेत. इर्विन रुग्णालयातील रक्तपेढी ही जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी आहे. या रक्तपेढीमधून जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये रक्तपुरवठा केला जातो. त्यामुळे या ठिकाणी रक्तदान केल्यानंतर ते रक्त सुरक्षित आहे का, याची चाचणी केली जाते आणि त्यानंतर सुरक्षित रक्त संबंधित रुग्णांना चढविले जाते. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये इर्विन रक्तपेढीमध्ये ४ हजार ४०९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात १०३ पिशव्या रक्त हे दूषित आढळून आले आहे.
या आजाराचे आहे दूषित रक्त
शासकीय रक्तपेढीमध्ये सहा महिन्यांत संकलित झालेल्या रक्ताच्या चाचणीमध्ये ०९ रक्तदात्यांचे रक्त हे एचआयव्ही पॉझिटिव्ह, १५ पिशव्या रक्त हे हिपॅटायटिस-बी, तर ७९ पिशव्या रक्त हे हिपॅटायटिस- सी विषाणू दूषित आढळून आले.
रक्तदान करताना घ्या काळजी?
रक्तदान करण्यापूर्वी रक्तदाता हा निरोगी आहे की नाही याची तपासणी करणे गरजेचे आहे. रक्तदाता जर रक्तदान करण्यापूर्वी काही दिवस आजारी असेल तर त्याने रक्तदान करणे टाळावे. रक्तदान केल्यानंतरही ते रक्त सुरक्षित आहे की नाही याची चाचणी करूनच संबंधित रुग्णांना द्यावे.
इर्विन येथे रक्त संकलित केल्यानंतर त्या रक्ताचे एचआयव्ही, मलेरिया, गुप्तरोग, हिपॅटायटिस-बी व सी या विषाणूंची चाचणी केली जाते. यामध्ये जे रक्त दूषित आढळले त्याची योग्य विल्हेवाट लावून सुरक्षित रक्तच रुग्णांना दिले जाते. सहा महिन्यांत १०३ बॉटल रक्त दूषित आढळले. – डॉ. आशिष वाघमारे, रक्तपेढी प्रमुख, इर्विन