मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच धांदल उडाली. मुंबईसह उपनगर, कल्याण-डोबिंवली तसेच नवी मुंबई, ठाणे परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.
नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईला शुक्रवारसाठी यलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार, संपूर्ण मुंबईत दुपारपर्यंत पावसाची चांगली बॅटिंग सुरू होती. मात्र दुपारी दोननंतर पावसाने ब्रेक घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर अगदीच रिमझिम पडणारा पाऊस आज पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. याचाच परिणाम मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सब-वे तसेच कुर्ला स्थानक परिसरात पाणी साचले आहे.
सकाळी बरसणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी वाहनांचा वेग मंदावला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस मुंबईत ठाण मांडून आहे. त्यामुळे उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शनिवारी मुंबईत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता.
लोकल १० ते १५ मनिटे उशिराने –
पावसाचा परिणाम मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेवर झाल्याचा दिसून येत आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन्स १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल ५ ते १० मिनिटे विलंबाने सुरू आहेत. त्याचबरोबर हार्बर लाईनवरील लोकल देखील १५ ते २० मिनिटे उशिरा सुरू आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमन्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेल्या २४ तासांतील पाऊस / मिमी-
१) कुलाबा- ११४
२) सांताक्रुज – ९२
शुक्रवारी ६ पर्यंतचा पाऊस / मिमी-
१) शहर -५१
२) पूर्व उपनगर- ३०
३) पश्चिम उपनगर – २५